विभागीय महारोजगार मेळाव्याचे उद्या मोरवाडीत आयोजन

0
207

पिंपरी, दि. २० (पीसीबी) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन वर्ष २०२३ च्या अनुषंगाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व बानाई संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने २१ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता औद्योगिक प्रशिक्षण विभाग, मोरवाडी पिंपरी येथे महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या संधीचा लाभ जास्तीत जास्त उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रामधील खाजगी उद्योजक सहभागी होणार असून त्यांच्याकडून सुमारे 2 हजारापेक्षा जास्त रिक्तपदे भरण्यात येणार आहे. या पदांकरीता किमान इयत्ता १० वी, १२ वी तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, पदविकाधारक, अभियांत्रिकी पदवी, एमबीए, बीसीए उत्तीर्ण आदी पात्रताधारक स्त्री-पुरुष उमेदवार पात्र असणार आहेत.

इच्छुक उमेदवारांनी http://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आपले पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक आहे. तसेच https://tinyurl.com/PCMC-ROJGAR-2023 या लिंकवर नोंदणी करावी. मेळाव्याच्या दिवशी प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पारपत्र आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या व आधारकार्डच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात. या मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर सिंह तसेच कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त सागर मोहिते यांनी केले आहे.

महापालिकेच्या वतीने दि १७ एप्रिल ते १९ एप्रिल दरम्यान रोजगार व स्वयंरोजगाराबाबत तसेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीबाबत विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप आणि प्रबोधन पर्वाचे मुख्य संयोजक डॉ. पवन साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली महारोजगार मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहे. बाणाईचे अशोक दामोदरे, विजय कांबळे आणि इतर पदाधिकारी तसेच महापालिकेचे उप आयुक्त रविकिरण घोडके, विशेष अधिकारी किरण गायकवाड, आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील, प्रबोधन पर्वाचे संयोजक प्रमोद जगताप, चंद्रकांत पाटील, राजदीप तायडे यांच्यासह शहरातील विविध मंडळे, संघटना आणि सामजिक कार्यकर्ते रोजगार मेळाव्याचे कामकाज हाताळत आहेत.