विनापरवाना झाडांची कत्तल, ठेकेदाराला वाचविण्यासाठी प्रशासनाचा आटापीटा

0
19

पिंपरी, दि. ३ –
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून मुळा नदीसुधार प्रकल्पाचे काम सुरु आहे. या कामात संबंधित ठेकेदाराकडून नदीकाठावरील झाडे तोडायची परवानगी न घेता तब्बल २१ झाडांची कत्तल करण्यात आली. या झाडांचा उद्यान विभागाने स्थळ पाहणी आणि पंचनामा अहवाल तयार करत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली. मात्र, राजकीय दबावापोटी नदीसुधार प्रकल्पाच्या मुख्य ठेकेदार कंपनीला वाचवण्यासाठी अज्ञाताविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे.

याबाबत महापालिकेचे उद्यान सहायक अनिल दशरथ गायकवाड यांनी अज्ञात व्यक्ती आणि अय्याप्पा कन्स्ट्रक्शनचे शंकर राठोड यांच्या विरोधात सांगवी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुळा नदी पुनर्जीवन सुधार प्रकल्पाचे काम सुरु आहे. हे काम सुरू असताना मुळा नदीपात्रातील पिंपळे निलखच्या पंचशीलनगर येथे अज्ञात व्यक्तीने ३ सुबाभूळ, १ कडूलिंब, १७ काटेरी बाभूळ अशा २१ वृक्षांची विनापरवाना वृक्षतोड केली आहे. तसेच पिंपळे निलख स्मशानभूमी शेजारी अय्याप्पा कन्स्ट्रक्शनचे शंकर राठोड या उपठेकेदाराकडून नदीसुधारचे काम सुरु आहे. या उपठेकेदाराकडून २ काटेरी बाभूळ, ३ सुबाभूळ, ५ करंज, १ उंबर, १ विलायती चिंच असे एकूण १२ झाडांच्या वेगवेगळ्या जाडीच्या विनापरवाना फांद्या तोडल्या आहेत.

दरम्यान, महापालिकेच्या उद्यान विभागाकडून मुळा नदी पुर्नजीवन सुधार प्रकल्पाच्या कामात २१ झाडे विनापरवानगी तोडल्याचे दिसून येत आहेत. याकरिता महापालिका उद्यान सहायक अनिल गायकवाड यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन स्थळ पाहणी अहवाल व पंचनामा तयार केला. यावेळी साक्षीदार म्हणून प्रशांत राऊळ आणि राजू सावळे हे देखील उपस्थित होते. महापालिकेच्या उद्यान विभागाकडून विनापरवानगी झाडे तोडल्याची तक्रार नोंदवूनही सांगवी पोलिसांकडून केवळ महाराष्ट्र नागरी क्षेत्रे झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ चे कलम नूसार अदखलपात्र गुन्हा दाखल करुन घेतला आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नदीकाठच्या झाडांचा संयुक्त सर्वेक्षण सुरु

महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून मुळा नदी पुर्नजीवन सुधार प्रकल्पाचे काम सुरु आहे. मुळा नदी काठाची लांबी १४.२० किलोमीटर इतकी आहे. या कामास पिंपळे निलख, विशालनगर परिसरात सुरु केले आहे. परंतू, नदीकाठावरील झाडांचे पर्यावरण आणि उद्यान विभागाकडून स्वतंत्र केलेल्या सर्वेक्षणात झाडांच्या आकडेवारीत तफावत येत आहे. त्यामुळे नदीकाठावर प्रकल्पात एकूण झाडे किती आहेत. प्रकल्पाला अडथळा ठरणारी झाडे किती, पुर्नरोपण करावी लागणारी झाडे किती, असा सविस्तर अहवाल पर्यावरण व उद्यान विभागाकडून एकत्रित करावा, याकरिता दोन्ही विभागाकडून नदीकाठच्या झाडांच्या संयुक्त सर्वेक्षणात सुरुवात केली आहे.

महापालिकेने मुळा नदीसुधार प्रकल्प राबवताना ठेकेदार कंपनीकडून पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांची चक्क दिशाभूल केली आहे. नदीसुधार प्रकल्पात पर्यावरण नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत आहे. नदीचे पात्र पुर्वीपेक्षा अरुंद केले आहे. नदीकाठची झाडे तोडली जात आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने नदीतील जैवविविधताही संपुष्टात आणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे संबंधित झाडे तोडणाऱ्या ठेकेदारावर अदखलपात्र नव्हे गंभीर गुन्हे दाखल करावेत, अशी आमची मागणी आहे.

-राजू सावळे, सामाजिक कार्यकर्ते

मुळा नदी पुनर्जीवन सुधार प्रकल्पाचे काम सुरु आहे. या प्रकल्पाचे कामास प्रारंभ करताना उद्यान विभागाकडून वृक्षतोड करण्यास कोणतीही परवानगी दिलेली नाही. आमच्या कर्मचा-यांनी केलेल्या स्थळपाहणीत २१ झाडांची विनापरवानगी तोड आणि १२ झाडांच्या फांद्या तोडल्याचे अहवालात नमूद केले आहे. तसेच आता उद्यान विभागाकडून नदीकाठच्या झाडांचे सर्वेक्षण सुरु केले आहे. झाडे तोडणाऱ्याच्या विरोधात सांगवी पोलिसात तक्रार दिली आहे.

-उमेश ढाकणे, सहायक आयुक्त, उद्यान विभाग, महापालिका

कायद्यानुसार या प्रकरणात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद होते. दाखल करण्यात आलेल्या अदखलपात्र गुन्ह्याबाबत संबंधितांनी न्यायालयात दाद मागणे आवश्यक आहे.

– महेश बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सांगवी

पर्यावरण विभागाची आकडेवारी

मुळा नदीकाठावर एकुण झाडे………………………………………………………..२२०५

प्रकल्पाला अडथळा ठरणारे झाड काढणे………………………………………….४३९

नदी काठावरील झाडाचे पुर्नरोपण करणे…………………………………………..६८१

एकूण झाडे काढणार……………………………………………………………………११२०

नदीकाठावरील एवढी झाडे वाचवणार……………………………………………….१०८५