विधान परिषदेला आमचा विचार होईल – सचिन खरात

0
326

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी अनिल सोनवणे

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) २०१४ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर असल्यामुळे येणाऱ्या काळात विधानपरिषद आमदारकीसाठी रिपब्लिकन पक्ष (खरात) गटाचा नक्कीच विचार होईल, असा विश्वास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी व्यक्त केला. यावेळी पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी अनिल सोनवणे यांची निवड केली असल्याचे खरात यांनी जाहीर केले.

रिपब्लिकन पक्ष (खरात) गटाच्या वतीने गुरुवारी पिंपरी येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी खरात बोलत होते. पुणे शहराध्यक्ष राजाभाऊ बोबडे, पुणे शहर महिला अध्यक्ष प्रियांका शिंदे, पुणे शहर युवती अध्यक्षा शिल्पा वनशिवे, पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष अक्षय चोपडे, सय्यद चौधरी, पिंपरी चिंचवड शहर कामगार अध्यक्ष श्रीकांत अहिरे, राज्य सचिव अनिल सोनवणे, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष दौलत कचरे, रोहिदास माघाडे, भोसरी विधानसभा महिला अध्यक्षा अल्पना कांबळे, वसंत कोळेकर, मिठूलाल यादव आदी उपस्थित होते.

खरात म्हणाले की, संविधान निर्माता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथे होत असलेले स्मारक लवकर व्हावे, भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या परिसराचे सुशोभीकरण करून या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसण्यात यावा असे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देऊन मागणी केली आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारने मागासवर्गीय महामंडळांना १०० कोटींचा निधी जाहीर केला होता. तो निधी महायुती सरकारने द्यावा, त्याव्दारे मागासवर्गीय समाजाचा विकास होईल, अशी मागणी केली. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष महायुतीच्या सत्तेत सामील झाला. यावेळी अजितदादांनी स्पष्टपणे सांगितले आहे की आम्ही राज्याच्या विकाससाठी सत्तेत सामील झालो आहे‌. अजित पवार हे फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचाराचे आहेत. ते महाराष्ट्राला विकासाकडे नेण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे गुरुजींवर कारवाई झाली पाहिजे असे, खरात म्हणाले.