विधान परिषदेचे भाजप आमदार शरद पवार यांच्या गळाला

0
133

बारामती, दि. १० – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार हे सध्या राज्याचा दौरा करत आहेत. राज्यात सर्वाधिक इनकमिंग हे राष्ट्रवादी शरद पवार गटात आहे. अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे शरद पवार गटात मोठी पोकळी आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक स्ट्राईक रेट शऱद पवार गटाचाच राहिला आहे, त्यामुळेही त्यांच्या पक्षाकडे इच्छूंकाचा ओढा अधिक आहे.

सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे नेते आज शरद पवार यांची भेट घेणार आहेत. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी यासाठी ही भेट असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान सोलापूरमधील भाजप नेते त्यांची भेट घेणार आहेत. भाजपचे विधान परिषदेतील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा देखील यात समावेश असल्याची माहिती आहे. त्यासोबतच आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत, वसंत नाना देशमुख, माजी नगराध्यक्ष नागेश भोसले हे नेते पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून इच्छूक आहेत. माढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना या भेटीसाठी पुढाकार घेतल्याची माहिती आहे. आज दुपारीच भाजप नेत्यांचा राष्ट्रवादी पवार गटात प्रवेश होण्याचीही शक्यता आहे.

भाजपला मोठा धक्का
कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर पवार भाजपला दुसरा धक्का देण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपचे विधान परिषदेतील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे आज (मंगळवार) दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील अशी शक्यता आहे. त्यांनी जर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला तर तो भाजपला मोठा धक्का असेल.