मुंबई, दि. ३ (पीसीबी) : विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बहुमतानं निवड झाली आहे. अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर मुख्यमत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेत्यांकडून सभागृहात त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. नार्वेकर हे विधानसभेचे देशातील सर्वात तरूण अध्यक्ष असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. तसेच त्यांनी नार्वेकरांची फिरकीही घेतली.
नार्वेकर हे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. त्यामुळे आता वरिष्ठ सभागृहात सासरे आणि विधानसभेचे अध्यक्ष जावई असं पहिल्यांदाच घडलं आहे. फडणवीस यांनाही त्यावर बोलण्याचा मोह आवरला नाही. यावेळी त्यांनी पु. ल. देशपांडे यांचा उल्लेख करत फिरकी घेतली.
फडणवीस म्हणाले, आज हाही योगायोगही असेल की, वरच्या सभागृहातील सभापती आणि यांचं नातं सासरं आणि जावयाचं आहे. पु. ल. देशपांडे असं म्हणतात की, जावई आणि सासऱ्याचं एकमत होणं कठीण. जावई म्हणजे सासऱ्याच्या पत्रिकेतील दशमग्रह आहे, असं पुलं म्हणतात, असं सांगत फडणवीसांनी नार्वेकरांची फिरकी घेतली.
महाराष्ट्राच्या इतिहासातील तर सर्वात तरूण आहेतच पण देशाच्या इतिहासातीलही तरूण अध्यक्ष आहेत. या सभागृहाच्या अध्यक्षस्थानाला विशेष महत्व आहे. हे कायदेमंडळ आहे. गडचिरोलीचा शेवटचा माणूस असो किंवा कुठल्यातरी कर्नाटकच्या सीमेवरील माणूस असो. प्रत्येेकाचा विचार, आशा-आकांक्षा या सभागृहात प्रतिध्वनित होतात. आणि छोट्यातले छोटे प्रश्न सोडवण्याची क्षमता य सभागृहात आहे. त्यामुळे या सभागृहाचे अध्यक्ष होणं, हा भाग्याचा योग आहे, असं फडणवीस म्हणाले.












































