विधानसभेच्या सर्वात मोठ्या AI सर्व्हेमध्ये सत्तेत महायुती की महाआघाडी

0
119

मतदारांच्या मनातील फेव्हरेट मुख्यमंत्री कोण, सर्वेक्षणातील अंदाज

मुंबई, दि. १७ ऑगस्ट (पीसीबी) – लोकसभेनंतरत आता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. येत्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक होऊ शकतात. निवडणूक आयोगाकडून लवकरच याची घोषणा होऊ शकते. राज्यातील 288 जागांसाठी यावेळी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत रंगणार आहे. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता, त्यावेळी भाजप आणि शिवसेना एकत्र युती म्हणून लढले होते. पण आता गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली. त्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडी अस्तित्वात आली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी 24 तासनं विधानसभेचा सर्वात मोठा AI सर्व्हे केला आहे. पहिली मराठी AI अँकर ZEENIA हा सर्व्हे जाहीर केला आहे. या सर्व्हेत आर्टिफीशिअल इंटेलिजेन्सचा वापर करण्यात आला आहे. डेटा कलेक्शन आणि डेटा प्रोसेसिंगमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करुन सर्व्हे तयार केला आहे. राज्यातील 288 मतदार संघात हे सर्व्हेक्षण करण्यात आलं असून या सर्वेक्षणात महाराष्ट्राचा कौल नेमका कुणाच्या बाजूने झुकला आहे. यांचा अंदाज घेण्यात आला आहे.

या सर्व्हेत मतदारांच्या मनातील फेव्हरेट मुख्यमंत्री कोण याचा अंदाज घेण्यात आला. या सर्व्हेत मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती कोणाला? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे पर्याय देण्यात आले होते. यापैकी सर्वाधिक मतदारांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पसंती दिली आहे. विधानसभा निवडणूक 2024 मध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पाहायला आवडेल असं मत मतदारांनी वर्तवलं आहे. तर दुसऱ्या पसंतीला सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मतदारांनी पसंती दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात अनेक योजना राबवण्यात आल्या. यापाकी मुख्यमंत्री लाडकी बहिण ही योजना गेमचेंजर ठरतेय. याचा फायदा एकनाथ शिंदे यांना झाला आहे. तर महाविकास आघाडीतल्या शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्या क्रमांकाची पसंती मिळाली आहे.

मुख्यमंत्री म्हणून कोणाचं काम चांगलं वाटलं?
राज्यात गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री म्हणून कोणाचं काम चांगलं वाटलं? या प्रश्नालाही लोकांनी भाजपे नेते देवेंद्र फडणवीस यांना पसंती दिली आहे. 2014 ते 2019 या पाच वर्षाच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. या काळात त्यांनी केलेल्या कामाला 42 टक्के मतदारांनी पसंती दर्शवली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या 2022-2024 या मुख्यमंत्री पदाच्या काळातील कामाला 35 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युती म्हणून एकत्र लढले. पण मुख्यमंत्री पदावरुन वाद झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर आपली वेगळी चूल मांडली. 2019 ते 2022 अशी अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद सांभाळलं. पण या काळातील कामाला लोकांनी तिसऱ्या क्रमांकाची पसंती दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या कामाला 23 टक्के मतं मिळाली आहेत.