विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांचा अजितदादांना पुन्हा धक्का! ‘तो’ बडा नेता तुतारी हाती घेणार?

0
10

सिंदखेड, दि. 15 (पीसीबी) : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आज जाहीर होण्याची शक्यता आहे. पुढच्या महिनाभरात निवडणूक प्रक्रिया पार पडेल. पण त्याआधीच शरद पवारांनी पुन्हा एकदा अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दोन नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यांचा शरद पवार गटातील प्रवेश निश्चित झाला आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील हे देखील नुकतंच शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेत.

बुलढाण्यातील सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र शिंगणे हे अजित पवारांची साथ सोडणार आहेत, अशी माहिती मिळते आहे. राजेंद्र शिंगणे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. काही दिवसांआधी सुप्रिया सुळे यांच्या गाडीतून एका नेत्याने प्रवास केला होता. यावेळी फाईलने त्यांनी चेहरा झाकला होता. सुप्रिया सुळेंच्या गाडीतून प्रवास करणारा नेता म्हणजे राजेंद्र शिंगणे… आता राजेंद्र शिंगणे यांचा शरद पवार गटातील प्रवेश निश्चित झाल्याचं कळतं आहे.

अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील हे शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. उमेश पाटील हे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. उमेश पाटील शरद पवारांच्या घरी जात असताना त्यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली. मी राजकारणात आल्यापासून मोहोळमधील हुकुमशाहीला विरोध आहे. शरद पवारांसोबत असल्यापासून माझा या हुकुमशाही आणि दडपशाहीला विरोध आहे. त्याच मुद्द्यावर शरद पवारांसोबत बोलण्यासाठी मी इथं आलो आहे, असं उमेश पाटील म्हणाले.