विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मुद्रणाबाबतची माहिती निवडणूक कार्यालयास देणे बंधनकारक- निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम

0
2

पुणे,दि.२४ (पीसीबी) :: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कालावधीत मुद्रणालयामध्ये निवडणूक विषयक कोणत्याही प्रकारचे मुद्रण होत असल्यास त्याची माहिती मुद्रणालय चालकाने निवडणूक कार्यालयास देणे बंधनकारक आहे, असे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कायदा व सुव्यवस्था समन्वय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम म्हणाल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात मुद्रणालय चालकांसोबत बुधवारी (२३ ऑक्टोबर) रोजी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.

श्रीमती कदम म्हणाल्या, लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ कलम १२७ (क) नुसार कोणतीही व्यक्ती मुद्रक व प्रकाशकाचे नाव व पत्ता नमूद केल्याशिवाय आणि दोन व्यक्तींनी साक्षांकित केलेले प्रतिज्ञापत्र प्रकाशकाकडून घेतल्याशिवाय कोणतीही निवडणूक पत्रके, भित्तीपत्रक, हस्तपत्रके किंवा अन्य कागदपत्रांचे मुद्रण करणार नाही, प्रकाशित करणार नाही किंवा मुद्रण करण्याची अथवा प्रकाशित करण्याची व्यवस्था करणार नाही.

कागदपत्रांच्या मुद्रणानंतर वाजवी वेळेत कागदपत्रांच्या प्रतीसह प्रतिज्ञापत्राची प्रत जिल्हा निवडणूक अधिकारी किंवा मुख्य निवडणूक अधिकारी यांना देण्याची जबाबदारी अशा मुद्रणालयाची आहे, असेही श्रीमती कदम म्हणाल्या.