विधानसभा निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या टप्प्यात

0
89

मुंबई, दि. १६ (पीसीबी) : राज्यात दिवाळीनंतर विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वर्षा बंगल्यावर पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विधानसभा निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या टप्प्यात होऊ शकतात, असे संकेत दिले आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणूक आयोगानं जरी निवडणुकीच्या तारखा जाहीर केलेल्या नसल्या, तरीही
१२ नोव्हेंबरच्या आसपास राज्यात विधानसभा निवडणूक होईल, असे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले आहे. ही निवडणूक दोन टप्प्यांमध्ये होणार असल्याचे त्यांनी सूचक विधान केले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनानं तयारी सुरु केली आहे. प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून लवकरच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल. त्यांच्याकडून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हालचाली सुरु होतील.

राज्यात विधानसभेची निवडणूक २०१९ मध्ये झाली होती. ती एकाच टप्प्यात झाली होती. महाराष्ट्र, हरियाणात एकाचवेळी निवडणूक झाली. पण यंदा महाराष्ट्राच्या आगोदर हरियाणामधली निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही.

राज्यात आंदोलनांचा जोर वाढलेला असल्यानं कायदा, सुव्यवस्थेचा विषय निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात मागील अनेक वर्ष एकाच टप्प्यात विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. २००४ पासून राज्यात विधानसभेच्या चार निवडणुका झाल्या. चारही वेळा एकाच टप्प्यात मतदान झालं. १९९९ मध्ये मात्र विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यात झाली होती. ५ आणि ११ सप्टेंबरला मतदान पार पडलं होतं. ही निवडणूक लोकसभा निवडणुकीसोबत झालेली होती. या निवडणुकीनंतर राज्यात सत्तापालट झाला होता.