जळगाव, दि. २६ (पीसीबी) : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला वेग आला आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी विद्यार्थी व युवक आघाडीच्या वतीने युवा संवाद व स्वाक्षरी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी चे राष्ट्रीय विद्यार्थी अध्यक्ष सनी मानकर, राष्ट्रवादी चे प्रदेश विद्यार्थी अध्यक्ष प्रशांत कदम पाटील, राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष अंजली आव्हाड यांच्यासह युवक आघाडीचे नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
तसेच, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने संभाजीनगर येथे मानवी साखळी कार्यक्रम व रायगड व नाशिक शहरात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस नाविन्यपूर्ण कल्पनांच्या माध्यमातून राज्याविषयीचे आपले व्हिजन मांडून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. अॅनिमेटेड व्हिडिओ, वॉल सिग्नेचर कॅम्पेन, रांगोळी निर्मिती स्पर्धा, मानवी साखळी कार्यक्रम अशा अनोख्या उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पुण्यात स्वाक्षरी मोहीम राबवली. हजारो लोकांनी पांढऱ्या कॅनव्हासवर स्वाक्षरी केली ज्यावर लिहिले होते – ‘माझी लाडकी बहिण योजनेला माझा पाठिंबा आहे, आणि ती पुढील 5 वर्षे सुरू राहावी अशी माझी इच्छा आहे.’
राष्ट्रवादी पक्षाची महिला शाखा, युवा शाखा आणि विद्यार्थी शाखा या वैविध्यपूर्ण उपक्रमांमध्ये आघाडीवर आहे. गेल्या काही आठवड्यांपासून पक्षाच्या युवक, विद्यार्थी आणि महिला शाखेसह आघाडीच्या संघटना मतदारांशी संपर्क साधण्यासाठी विविध अनोखे उपक्रम राबवत आहेत.पक्षाचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण आणि महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील राज्यातील विविध मतदारसंघात स्वाक्षरी मोहीम राबविली आहे.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार स्वत: रस्त्यावर उतरले आहेत. सध्या ते जनसन्मान यात्रा या राज्यव्यापी यात्रेवर असून त्याद्वारे ते सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती जनतेला देण्याचा प्रयत्न करत आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेली लाडकी बहिण योजना महिलांमध्ये लोकप्रिय झाली असून, ती सरकारसाठी गेम चेंजर ठरू शकते, असे अनेक राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर क्रिएटिव्ह व्हिडिओच्या माध्यमातून पक्ष राज्यातील विकासाच्या उपक्रमांचे दर्शन घडवत आहे. गेली ३५ वर्षे बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांनी या भागाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. बारामती विधानसभा मतदार संघात साडेसातशे कोटींहून अधिक रुपयांची विकासकामे सुरू असून, बारामतीत रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. बारामती येथील जनसन्मान यात्रेदरम्यान अजित पवार म्हणाले होते की, “बारामतीत मेडिकल कॉलेजही आम्ही स्थापन केली, या कॉलेजची मागणी नसताना देखील आम्ही हे कॉलेज उभारलं. समाजाच्या विनंतीनुसार या वैद्यकीय महाविद्यालयाला आदरणीय अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात आले आहे.” बारामती विधानसभा मतदार संघात इतर २८७ मतदारसंघांपेक्षा अधिक काम केले असल्याचा दावा उपमुख्यमंत्र्यांनी केला आहे.
या उपक्रमांच्या माध्यमातून महिलांना १५०० रुपयांची आर्थिक मदत देणारी माझी लाडकी बहिण योजना, १.६ कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ , ५२ लाख कुटुंबांना मोफत ३ गॅस सिलिंडर, बळीराजा योजनेच्या माध्यमातून ४४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना वीज माफी, युवा कार्य शिक्षण योजना व मुलींना फी शिक्षण अशा शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा लाभ मतदारांपर्यंत पोहोचवत आहे