विधानसभा निवडणुकिच्या आधी महाराष्ट्रात पुन्हा मोठा भूकंप होणार

0
54

दि. ३१ जुलै (पीसीबी) – राज्याच्या विधानसभेची निवडणूक पुढच्या दोन ते तीन महिन्यांत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने सध्या सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राजकीय नेते विविध मतदारसंघाचा दौरा करत आढावा घेत आहेत. याचबरोबर विविध ठिकाणी सभा, मेळावे आणि आढावा बैठका असं सर्व सध्या सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात प्रामुख्याने महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत. मात्र, या निवडणुकीच्या आधीच सध्या राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ४० पैकी १८ आमदार थेट शरद पवार यांच्या संपर्कात असल्याने दादांची राष्ट्रवादी फुटणार तसेच भाजपमधूनही त्यांना स्वतंत्र लढण्यासाठी मजबूर करण्याच्या हालाचाली सुरू असल्याची चर्चा आहे.

यातच शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी ७ ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. आता यासंदर्भात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोठं विधान केलं आहे. “यावेळी काही ना काही मोठा भूकंप होईल”, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.“उद्धव ठाकरे यांनी मला जर सांगितलं की तुम्ही विधानसभा लढवा आणि निवडणुकीत गद्दारांचा पराभव करण्यासाठी तुम्हीच सक्षम उमेदवार आहात, असं ते म्हणाले तर माझी निवडणूक लढवण्याची तयारी आहे. सध्या तरी मी उद्धव ठाकरेंकडे उमेदवारीबाबत काहीही बोललो नाही. मात्र, यावेळी महाविकास आघाडी एक-एक उमेदवार निवडून आला पाहिजे, हे पाहून उमेदवारी देणार आहे”, असं चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

“मराठा आरक्षणाबाबतची भूमिका उद्धव ठाकरे स्पष्ट करतील. मात्र, संजय शिरसाट बोलले की उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी. मग संजय शिरसाट कोण सांगणारे? ते तर सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते आहेत ना? मुख्यमंत्री जे बोलतात ते करत नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठा आरक्षणाबाबत काहीच बोलत नाहीत”, असा हल्लाबोलही खैरे यांनी केला.
काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री म्हणून अब्दुल सत्तार यांची नियुक्ती करण्यात आली. यावर बोलताना खैरे म्हणाले, “अजून एक दोन महिने जाऊद्या मग माहिती पडेल की ते पालकमंत्री म्हणून कसं काम करतात. मात्र, एक-दोन महिन्यांत हे सरकारच जाणार आहे. मग काय होणार? त्यामुळे पालकमंत्री म्हणून अब्दुल सत्तार दोन महिने मजा करतील”, अशी टीका त्यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयात अपात्र आमदार प्रकरणाची ७ तारखेला सुनावणी होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले, “यावेळी काही ना काही मोठा भूकंप होईल. आता आमच्या जिल्ह्यामधील पाच जण फुटलेले आहेत. त्यातील चारजण हे अपात्र प्रकरणामधील १६ आमदारांमध्ये आहेत.”