विधानसभा निवडणुका जाहीर होताच राज ठाकरे ॲक्शन मोडमध्ये; मनसे उमेदवारांची आज होणार घोषणा?

0
68

मुंबई, दि. 16 (पीसीबी) : केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेत राज्यातील निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार येत्या २० नोव्हेंबर २०२४ ला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर त्यानंतर लगेचच तीन दिवसांनी २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना ॲक्शन मोडमध्ये आली आहे. सध्या राज्यात मनसेच्या बैठकांचा धडाका पाहायला मिळत आहे.

विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच राज्यात मनसेच्या बैठकांचा धडाका पाहायला मिळत आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवाजी पार्क या ठिकाणी असलेल्या शिवतीर्थ या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला मनसेचे महत्त्वाचे नेते उपस्थित असणार आहेत. राज ठाकरे यांनी स्वत: ही बैठक बोलवली आहे. आज १६ ऑक्टोबरला सकाळी साधारण नऊ वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही बैठक होणार आहे.

कालच राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी ही बैठक बोलवली आहे. तर दुसरीकडे राज ठाकरेंचे सुपूत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर असणार आहेत. अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात बैठक पार पडणार आहे. सकाळी साधारण १० नंतर पुण्यात मनसेच्या बैठकांचे सत्र सुरु होईल. या बैठकीला पुण्यातील मनसेचे नेते आणि पदाधिकारी उपस्थति असणार आहे.

विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच मनसेने काही जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. यात मुंबईसह महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे.

1. शिवडी, मुंबई – बाळा नांदगावकर 2. पंढरपूर – दिलीप धोत्रे 3. लातूर ग्रामीण – संतोष नागरगोजे 4. हिंगोली विधानसभा – बंडू कुटे 5. चंद्रपूर – मनदीप रोडे 6. राजुरा – सचिन भोयर 7. वणी – राजू उंबरकर