विधानसभा उपाध्यक्षपदासाठी राजकुमार बडोले आणि अण्णा बनसोडेंच्या नावाची चर्चा

0
3

मुंबई, दि. 19 (पीसीबी)
महायुतीमध्ये विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांना पुन्हा एकदा संधी मिळाली. आता उपाध्यक्षपदाबाबत खल सुरू आहे. विरोधकांना मिळावी, असा प्रस्ताव विरोधकांकडून आला. प्रत्यक्षात या पदावर भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील आमदारालाच संधी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान, अजित पवार यांचा निष्ठावंतांपैकी पिंपरी राखीव मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे यांचे नाव अचालन चर्चेत पुढे आले आहे. दुसरीकडे भाजपमधील जेष्ठ आमदार माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या नावाचा भाजपने अग्रह धरला आहे.

उपाध्यक्ष पदासाठी किमान कायद्याचे ज्ञान आणि सभागृह चालविण्याचा अनुभव आवश्यक आहे. आमदार बनसोडे यांना मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून संधी मिळणार, अशी चर्चा होती. प्रत्यक्षात त्यांचे नाव कुठेही आले नाही. तीन टर्म आमदार असल्याने पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व ठेवण्यासाठी अजित पवार यांना बनसोडे यांना ताकद देण्याची गरज वाटते. प्रत्यक्षात विधीमंडळातील नियम आणि एकूणच कामकाजात आमदार बनसोडे यांचा कुठेही सहभाग नसल्याने त्यांच्या नावाचा कितपत विचार होईल याबाबत साशंकता आहे. विरोधकांची संख्या अत्यंत कमी असल्याने यापुढे सभागृहात कुठलाही बाका प्रसंग उभा राहण्याची शक्यता दिसत नाही म्हणून अजितदादा आमदार बनसोडे यांच्यासाठी आग्रही आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कुठेही अडचण येऊ नये यासाठी या पदावर त्यांना अनुभव संपन्न व्यक्ती पाहिजे आहे. राजकुमार बडोले यांनी २०१४ मध्ये न्याय मंत्री म्हणून काम सांभाळले असून ते उच्चशिक्षित आहेत. विधानसभा सभा तालिकेवरही त्यांनी काम केलेले असल्याने सभागृह कसे चालवायचे याचाही त्यांना अनुभव आहे. अशा परिस्थितीत बनसोडे की बडोले अशी तुलना सुरू झाली आहे. स्वतः फडणवीस हे बडोले यांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ घालू इच्छितात, अशी चर्चा आहे.