विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कार्ला येथील श्री एकविरा देवीचे घेतले दर्शन

0
175
  • मंदिर परिसराचा लवकरच होणार कायापालट

कार्ला दि.२३ (पीसीबी): शिवसेनेच्या नेत्या तथा विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवरात्रीच्या अष्टमीचे औचित्य साधत कार्ला येथील श्री एकविरा देवीचे दर्शन घेतले. डॉ. गोऱ्हे यांनी देवीची धार्मिक पूजा विधी करत आरती केली व देवीला साडीचोळी अर्पण केली.

श्री एकविरा आईने, कर्तव्य पूर्ण करण्यासाठी शक्ती, उत्तम आरोग्य, सौख्य आणि यश द्यावं आणि इथे आलेल्या महिलांची स्वप्न पूर्ण व्हावीत, सर्व बांधवांच्या जीवनात यश मिळावं अशी देवी चरणी प्रार्थना डॉ. गोऱ्हे यांनी केली.

नवरात्रीच्या पहिल्या माळे दिवशीच पुणे जिल्हाधिकारी श्री राजेश देशमुख यांच्यासोबत बैठक घेतली आहे. यामध्ये एकविरा देवी मंदिराच्या पायऱ्यांची दुरुस्ती, रोप वे, भक्त निवास यांसह इतर पायासुविधांना अधिक गतीने चालना देण्यासाठी सरकारने एमएसआरडीसीकडे जबाबदारी सोपवली आहे. यामुळे या परिसरात विकासात्मक कार्यामधून येथील चित्र बदललेले दिसेल. तसेच केंद्रीय पुरातत्व विभागाने परवानगी दिलेली आहे. वन विभागाच्या जागे संदर्भात लवकरच वन मंत्री मा. श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सोबत बैठक घेणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

याप्रसंगी, उपजिल्हा प्रमुख श्री दत्ता केदारी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री राजेश वाबळे, युवासेना शहर प्रमुख श्री माऊली जगताप, महिला जिल्हा प्रमुख श्रीमती शैला पाचपुते, महिला शहर प्रमुख श्रीमती शैला पाटील, उपशहर महिला संघटिका श्रीमती सुनीता चंदने, श्री विशाल हुलावळे, श्री मुन्ना मोरे यांसह मोठया संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.