विधवा विधुर यांनी योग्य जोडीदार निवडून पुनर्विवाह करून जीवनसाथी मिळविणे ही काळाची गरज !!! —सत्यशोधक ढोक

0
482

फुले एज्युकेशन तर्फे शाहु महाराज यांच्या जयंती निमित्त लीनता आणि प्रवीण यांचा ४५ वा मोफत सत्यशोधक पुनर्विवाह संपन्न केला .

पुणे, दि. २४ जून (पीसीबी) – फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौंडेशनच्या वतीने शाहु महाराज यांच्या १४९ व्या जयंती निमित्त व सत्यशोधक समाज स्थापना दिन शताब्धी सुवर्ण महोस्तवी वर्षानिमित्त सत्यशोधिका लीनता जगताप (माळी) MA.Bed, विधवा ( वय-४९ ) पुणे आणि सत्यशोधक प्रवीण खोतकर (ब्राह्मण) BA, विधुर ( वय-५४ ), अकोला यांचा ४५ वा मोफत सत्यशोधक आंतरजातीय पुनर्विवाह बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्र,पुणे येथे शुक्रवार दि.२३ जुन २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या पध्द्तीने विधीकर्ते सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी नेहमीप्रमाणे महात्मा फुले यांच्या वेशभूषेत संस्थेच्या वतीने संपूर्ण खर्च करीत पार पाडला.

याप्रसंगी सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी प्रतिपादन केले की कौटुंबिक जीवन जगत असताना आपला जोडीदार अचानक निधन पावल्याने एकट्याने उर्वरित आयुष्य काढणे अवघड होते. त्यामुळे पुनर्विवाह करणे काळाची गरज आहे. यासाठी वधू वर यांनी जात पात धर्म न पाळता मानवता धर्म एकच समजून जीवनसाथी म्हणून योग्य जोडीदाराची निवड करावी. पुढे ढोक म्हणाले की अंधश्रद्धा ,कर्मकांड याला तिलांजली देत आज जगताप खोतकर यांनी सत्यशोधक पध्दतीने अंतरजातीय पुनर्विवाह करून सर्व समाजाला एक दिशा दिली आहे. त्यांना दोन दोन मुली असताना जावई मुली यांच्यावर अवलंबून न रहाता ही एकटे राहण्यापेक्षा जोडीदार असल्याने उर्वरित आयुष्य आनदाने घालवू शकतात असे देखील म्हंटले.

यावेळी लीनता व प्रवीण म्हणाले की आम्ही वधु वर केंद्र चालवीत असताना इतरांना सत्यशोधक पध्द्तीने विवाह करा असे सांगत होतो , आता आम्ही सत्यशोधक पध्द्तीने विवाह करून कृतीशील निर्भय सत्यशोधकं बनल्याने आता हक्काने प्रसार करणार आहे कारण या मध्ये कोठेही आर्थिक उधळपट्टी नसून महापुर्षांचे आचार,विचाराने लग्न केल्याने उलट आत्मिक समाधन मिळते असे देखील सांगणार आहोत.

यावेळी वधु वर यांची रजिस्टर नोंदणी करून अध्यक्ष ढोक ,प्रा.सुदाम धाडगे आणि जालिंदर माळी यांच्या शुभहस्ते सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि थोर समाज सुधारक महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले फोटोफ्रेम भेट दिली. .तसेच वधू वर यांचे हस्ते आरक्षणाचे जनक छत्रपती शाहु महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास व फुले दांपत्य यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार घालून व राष्ट्रीय ग्रंथ भारताचे संविधान ,महात्मा फुले समग्र वाड्मय याची सर्वांनी पुजा करून शाहूमहाराज जयंती सत्यशोधक विवाह लावून साजरी केली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विश्वस्थ प्रा.सुदाम धाडगे यांनी महात्मा फुले रचित मंगळाष्टकाचे गायन केले तर माळी विकास वधू वर केंद्राचे अध्यक्ष हनुमंत टिळेकर यांनी आभार मानले.मोलाचे सहकार्य सत्यशोधिका आशा व आकाश –क्षितीज ढोक, सौ.निलम बरगे ,वर्षा काटे व गोविंद बनसोडे यांनी केले .