विद्युत सुरक्षेसोबतच आरोग्याची काळजी घ्या, मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांचे आवाहन

0
180

पुणे, दि. ११ (पीसीबी) : अत्यंत धकाधकीच्या सेवा क्षेत्रात काम करताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत सुरक्षेच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे. कोणत्याही परिस्थितीत विद्युत अपघात होणार नाही याची प्रत्येक क्षणी काळजी घ्यावी. सोबतच स्वतःच्या आरोग्याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे व नियमित वैद्यकीय तपासणी करावी असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी केले.

महावितरणच्या पुणे परिमंडल व लोकमान्य हॉस्पीटल यांच्यामध्ये आरोग्यविषयक सुविधा, तपासणी व प्रशिक्षणाबाबत एक वर्षासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यानुसार मुळशी विभाग अंतर्गत नसरापूर उपविभाग कार्यालयात मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक अभियंता सर्वश्री प्रकाश राऊत, सतीश राजदीप व डॉ. सुरेश वानखडे, लोकमान्य हॉस्पीटलचे डॉ. जयंत श्रीखंडे, कार्यकारी अभियंता श्री. माणिक राठोड यांची उपस्थिती होती.

या प्रशिक्षण शिबिरामध्ये विद्युत अपघातानंतर घ्यायची काळजी, प्रथमोपचार, कृत्रिम श्वासोश्वास आदींची माहिती देण्यात आली. तसेच वीजसुरक्षेबाबत विविध उपाययोजनांची माहिती डॉ. संतोष पटनी यांनी दिली. या कार्यक्रमाला सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्रीमती ज्ञानदा निलेकर, कार्यकारी अभियंता श्री. बाळासाहेब हळनोर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. शिरीष काटकर, उपकार्यकारी अभियंता श्री. नवनाथ घाटुळे आदींसह नसरापूर उपविभागातील अभियंते व कर्मचारी उपस्थित होते.