विद्यार्थ्यांसमोर फ्री स्टाईल हाणामारी करणा-या शिक्षकांसह मुख्याध्यापिकेला नोटीस

0
295

पिंपरी, दि.7 (पीसीबी) – विद्यार्थ्यांसमोर हाणामारी करून बेशिस्त वर्तणूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रहाटणी येथील शाळेतील दोन उपशिक्षकांना शिक्षण विभागाने कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. तसेच शिक्षण विभागापासून हा प्रकार लपविल्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापिकेलाही नोटीस देण्यात आली.

शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी मुख्याध्यपिका अलका ताटे, उपशिक्षक अण्णा वाघोले, गणेश लिंगडे यांना नोटीस दिली आहे. महापालिकेची रहाटणी येथे शाळा आहे. या शाळेत उपशिक्षक लिंगडे आणि वाघोले कार्यरत आहेत. या दोघांमध्ये कर्मचारी महासंघ आणि शिक्षक संघटनेच्या मुद्यावरून वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही उपशिक्षकांची चालू वर्गातच हाणामारी झाली. या हाणामारीची महापालिकेच्या शिक्षण विभागाला मुख्याध्यापिकेने देणे अपेक्षित होते. या हाणामारीची माध्यमातून वाच्यता झाल्यानंतर शिक्षण विभागाला माहिती मिळाली.

महापालिकेच्या शिक्षण विभागाची आणि शाळेची बदनामी झाली आहे. त्यामुळेच मुख्याध्यापिकेसह तिघांना शिस्तभंगाची कारवाई का करू नये? अशी विचारणा करणारी नोटीस देण्यात आली.