विद्यार्थ्यांशी ‘परिक्षे पे चर्चा’ करणारे नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान

0
383

-माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे प्रतिपादन
-नोव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये चित्रकला स्पर्धेचे बक्षिस वितरण

पिंपरी, दी.२२ (पीसीबी) – शैक्षणिक जडणघडणीत परिक्षा हा विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी महत्त्वाचा विषय असतो. परिक्षेच्या या तणावातून विद्यार्थ्यांनी मुक्त व्हावे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी परिक्षा पे चर्चा करणारे नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान आहेत, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

संभाजीनगर, चिंचवड येथील नोव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या परिक्षा पे चर्चा कार्यक्रमाअंतर्गंत शहरात आंतरशालेय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ शनिवारी माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी व्यासपीठावर नॉव्हेल ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे, शाळेच्या संचालिका व माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, प्रसिध्द चित्रकार सुनील शेगावकर, भाजप संघटन सरचिटणीस अमोल थोरात आदी उपस्थित होते.

प्रकाश जावडेकर पुढे म्हणाले, “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रम २०१८ मध्ये सुरू झाला. यावर्षी येत्या 27 जानेवारीला पुन्हा हा भव्य कार्यक्रम होणार आहे. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच वेळी देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. विद्यार्थी व पालकांवरील हा तनाव दूर व्हावा. याकरिता ते हा प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. कोणत्याही कलेमुळे मनाला प्रसन्नता मिळते. त्यामुळे विद्यार्थी स्पर्धेमध्ये सहभागी होतात, हे खूप मोलाचे आहे”.

अमित गोरखे म्हणाले की, “परिक्षा पे चर्चा या उपक्रमाअंतर्गंत घेतलेल्या या चित्रकला स्पर्धेत शहरातील सर्वच नामांकित शाळा आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देताना त्यांनी आपल्या उज्वल भविष्याविषयी अवगत व्हावे. यासाठी जी-२० जागतिक विश्वगुरु बनण्याकडे भारताची वाटचाल, आझादी का अमृत महोत्सव, सर्जिकल स्ट्राईक, स्वच्छ भारत, आत्मनिर्भर भारत असे विषय चित्रकलेसाठी विद्यार्थ्यांना देण्यात आले. विद्यार्थ्यांनी चित्राच्या माध्यमातून या विषयांवर आपली कल्पकता मांडली आहे”.

चित्रकला स्पर्धेत प्रथम पायल नारखेडे, व्दितीय सिद्धांत अगरवाल आणि तृतीय क्रमांक समृद्धि भेनकी या विद्यार्थ्यांना मिळाला. पारितोषिक मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन प्रकाश जावडेकर यांनी सन्मानित केले. स्पर्धेचे परिक्षक म्हणून सुनील शेगावकर, अमर ठोंबरे, ज्योती कुंभार यांनी काम पाहिले. उषा रमेश यांनी सूत्रसंचालन केले.