संदीप वाघेरे यांच्यावतीने करिअर मार्गदर्शन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
पिंपरी दि. ११ (पीसीबी) – ”समाजाचे आपणही काहीतरी देणे लागतो यासाठी आपले ज्ञान समाजासाठी वापरले पाहिजे. समाजाकरिता कार्य केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी केवळ गुणांच्या मागे न धावता डोळे विस्पारून जगाकडे पाहावे. व्यवसायात, व्यापारात भाग घ्यावा. भारत ही जगातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे. पण, दुर्दैवाने आपल्याला हे समजलेच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उद्योग, व्यवसायाचे शिक्षण घेऊन पुढे जावे. यशस्वी होण्याचा हाच तर खरा मार्ग आहे”, असा मूलमंत्र प्रसिद्ध व्याख्याते डॉ. गणेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
संदीप वाघेरे युवा मंचातर्फे प्रभाग क्रमांक 21 मधील इयत्ता 10 व 12 वी मध्ये उल्लेखनीय गुण प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनींचा सत्कार सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम तसेच प्रभागातील इयत्ता 1 ली ते 8 वी मधील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. त्यावेळी डॉ. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. पोलीस उपाआयुक्त मंचक इप्पर, जेष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर, आयोजक माजी नगरसेवक संदीप वाघेरे, पवना बँकेचे संचालक शिवाजी वाघेरे, जेष्ठ नागरिक संघाचे शांताराम सातव, माजी नगरसेवक संतोष कुदळे, शुभांगीताई वाघेरे, सुभाष वाघेरे, दीपिका कापसे आदी यावेळी उपस्थित होते.
पोलीस उपाआयुक्त मंचक इप्पर म्हणाले की, ”प्रतिकूल परिस्थितीमध्ये यश मिळवताना यशाला शॉर्टकट नसतो. यश हे चिरकाळ टिकले पाहिजे. यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्याने प्रयत्न सुरु ठेवले पाहिजेत. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करून पुढे गेले पाहिजे. ज्यांना कमी गुण आहेत. अशा विद्यार्थ्यांनी खचून न जाता परिस्थितीला सामोरे गेले पाहिजे. परिस्थिती बदलण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे शिक्षण आहे आणि यासाठी स्वत:ला झोकून देणे गरजेचे आहे”.
या उपक्रमाविषयी सांगताना संदीप वाघेरे म्हणाले कि, ”सालाबादप्रमाणे यावर्षी संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने इयत्ता 10 व 12 वी मध्ये उल्लेखनीय गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी चांगली दिशा मिळेल. विद्यार्थ्यांनी आपल्याला आवड असलेले क्षेत्र निवडावे. त्यात झोकून देऊन अभ्यास करावे, यश नक्कीच मिळेल”.
गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक इयत्ता 10 वी मधील सिया अमित यादव व इयत्ता 12 वी मधील दृष्टी भगवान जाधवानी या विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्यात आला. तसेच द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक इयत्ता 10 वी अनघा विजय रणदिवे व निशील रामकृष्णन नायर तसेच इयता 12 वी मधील तन्वी विनोद रोहीडा व प्रीत महेश इंजनानी यांना देण्यात आले. याचबरोबर 80 टक्यांपेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या एकूण 96 विद्यार्थ्यांना पेन ड्राईव्ह व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रभागातील 1 ली 8 वी मधील 650 गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. वाघेरे यांच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कार्यक्रमाचे नियोजन संदीप वाघेरे युवा मंचचे अध्यक्ष हरीश वाघेरे, शुभम शिंदे, गणेश मांजाल, मयूर बोडगे, राजेंद्र वाघेरे, रंजनाताई जाधव, अश्विनी लोहार, अपूर्वा खोचाडे यांनी केले. तर, सूत्रसंचालन रामभाऊ कुदळे यांनी केले.