पिंपरी दि. २६ (पीसीबी)
– शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच पर्यावरण पुरक राहणीमानाबददल जागरुक करणे गरजेचे असून प्लास्टीक मुक्ती, वसुंधरेच्या रक्षणाबाबत जनजागृतीपर धडे देवून पर्यावरण संवर्धन मोहिमेत सहभागी करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिका तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले.
पिंपरी चिंचवड महापालिका, स्मार्ट सिटी व मुख्याध्यापक महासंघ यांच्या संयुक्त् विद्यमाने निगडी प्राधिकरण येथील किर्ती विद्यालयात आज (शनिवारी) सकाळी वृक्षारोपण करण्यात आले. स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, अ क्षेत्रिय अधिकारी शीतल वाकडे, माध्य व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षा प्राचार्या साधना दातीर, किर्ती विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक जाधव, वसंतदादा हायस्कूलच्या प्राचार्या नेहा पवार, मुख्य लिपीक वैशाली सानप यांच्यासह मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी व शिक्षक, विद्यार्थी, मनपा अधिकारी- कर्मचारी, स्मार्ट सारथी टीम मोठया संख्येने उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने शुन्य कचरा व्यवस्थापन मोहिम हाती घेतली आहे. शाळांनी देखील आपल्या परिसरात झाडांचा पालापाचोळा, कच-याचे व्यवस्थापन करावे. कच-याचे कंम्पोस्टींग, गांडूळ खत तयार करून बागकामासाठी वापर कसा करता येईल, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती द्यावी. पर्यावरणाचा –हास कसा थांबविता येईल, याबाबत संदेश देवून त्यांना जागृत करावे. त्याचबरोबर, आपल्या मनातील सुंदर शहर प्रत्यक्षात उतरविण्यासाठी दि. २४ ते ३० जून या कालावधीत होत असलेल्या ऑनलाईन निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, फोटोग्राफी व प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्यार्थी व नागरिकांनी सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले. तत्पूर्वी, ढोल ताशा, लेझीमच्या गजरात शाळेच्यावतीने आयुक्त् यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वती मूर्ती पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयामार्फत स्मार्ट सिटी मिशनचा ७ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. २५ जून २०२२ रोजी स्मार्ट सिटी मिशनला ७ वर्षे पुर्ण होत आहेत. या कालावधीत व हरित शहर, नव्याने विकसीत झालेले प्रकल्प, नवकल्पना, तंत्रज्ञानाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी केंद्र सरकारच्या “सबका भारत, निखरता भारत” या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम पिंपरी चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटीच्या वतीने दि. २५ ते २७ जून २०२२ या कालावधीत राबविण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थी, नागरिक, शैक्षणिक, सामाजिक संघटना यांना मोठया संख्येने सहभागी करण्यात आले आहे. शहरातील २५० हून अधिक मनपा व खाजगी शाळांनी एकाच दिवशी आपल्या शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धन मोहिमेत सहभाग नोंदविला आहे.
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी मार्फत उभारण्यात आलेले आयसीसीसी (ICCC) ला विद्यार्थ्यांच्या भेटींचे आयोजन, स्मार्ट सिटी प्रकल्प पाहणी दौरा, तज्ञ आणि मीडियासाठी क्युरेटेड ट्रिपची योजना, मिशन प्रवासाचे चित्रांकन, हवामान जागरूकता मोहीम, लोकांची मते, सार्वजनिक जागा सुधारणे, तरुण उद्योजकांसाठी तंत्रज्ञानावर आधारित ‘आयडियाथॉन’ आणि नागरी उपायांची अंमलबजावणी, शाळांमध्ये प्रश्नमंजुषा, सार्वजनिक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, रेडिओ शो, कौशल्य विकास केंद्र स्टार्टअपमध्ये नवोपक्रम मेळावे, हरित शहर, नागरिकांना स्मार्ट सिटी प्रकल्पांजवळ देशी वृक्ष लावण्यासाठी जागृत करणे, शहरी शेतीवरील कार्यशाळा, थंड आणि ऊर्जा कार्यक्षम इमारत बांधकाम पद्धती, स्मार्ट सिटी फेअर – कौशल्य विकास केंद्रातील उत्पादनांचे प्रदर्शन, जलद, कमी किमतीत प्लेसमेकिंग / स्थानिक परिवर्तन आदी उपक्रम घेण्यात येत आहेत.