- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा वार्षिक स्नेह उत्सव आणि गुणगौरव सोहळा संपन्न….*
पिंपरी, दि. २७ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने शनिवार दिनांक २६ एप्रिल रोजी निगडी प्राधिकरण येथील ग.दि. माडगूळकर सभागृहात वार्षिक स्नेह उत्सव, गुणगौरव आणि पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सहाय्यक आयुक्त शिक्षण विभाग विजयकुमार थोरात, शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर, तसेच प्राथमिक शाळांमधील सर्व मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षण विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तर शालेय विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तू देऊन प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांचा सन्मान केला.
मार्गदर्शनपर भाषणात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी शिक्षण क्षेत्रात अविरत काम करत राहिल्यास सर्व समस्यांना तोंड देऊ शकू असा विश्वास व्यक्त केला. “विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमासोबत आयुष्यात चांगला माणूस कसा घडेल यावर लक्ष केंद्रित करावे.” आयुक्त सिंह यांनी पुढे म्हटले की, गेल्या तीन वर्षांत शिक्षण विभागात शिक्षक आणि पालकांच्या मदतीने खूप चांगले बदल घडवून आणले आहेत. “आजही अनेक शाळांच्या खोल्या व मैदानांच्या समस्या आहेत, परंतु येणाऱ्या पाच वर्षांत आपण असेच काम करत राहिलो तर सर्व समस्यांना तोंड देऊ शकतो,” असेही त्यांनी सांगितले. यावर्षी भोसरी, दापोडी, दिघी येथील शाळांमध्ये डान्स रूम, कला कक्ष, स्टाफ रूम अशा सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सर्व पर्यवेक्षकांनी अपेक्षेपेक्षा चांगले काम केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. “शाळा व्यवस्थापन समितीमुळे पालिकेच्या शिक्षण विभागाच्या कामात चांगली मदत होत आहे. आपली शिक्षणाची चळवळ पालक समिती आणि शिक्षक, मुख्याध्यापक, पालकांनी निरंतर चालू ठेवली तर आपण मोठा बदल घडवू शकतो,” असे त्यांनी नमूद केले.
आयुक्त सिंह यांनी इयत्ता आठवी, नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे सांगितले. “सक्षम हा उपक्रम आपल्याला फार काळ चालवायचा नाही कारण येणाऱ्या काळात मौल्यवान बदल घडवणार आहोत. 64 शाळांमध्ये कला आणि क्रीडा शिक्षक लवकरच रुजू होणार असल्याचीही त्यांनी माहिती दिली. “लवकरच विद्यार्थ्यांना एकाच छताखाली सर्व प्रकारचे खेळ खेळता येतील आणि लवकरच यावर उपाययोजना करून काम सुरू करणार आहोत,” असेही त्यांनी सांगितले.
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी आपल्या भाषणात शिक्षक आणि शिक्षण विभागाचे चांगले काम सुरू असल्याचे नमूद केले. “पिंपरी चिंचवड महापालिका चांगल्या दिशेने मार्गक्रमण करत आहे,” असे त्यांनी सांगितले. यावेळी शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याचे त्यांनी नमूद केलं. सारथी पोर्टलचा चांगल्या प्रकारे शिक्षकांनी उपयोग करावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. “भविष्यात क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून चांगले खेळाडू घडवण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आपल्या शाळांतून तयार होतील,” अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी सांगितले की, सारथी पोर्टलद्वारे ८८ टक्के तक्रारी निकाली काढल्या आहेत आणि ३५ तक्रारी प्रलंबित आहेत, ज्यांवर देखील लवकरच कारवाई होणार आहे. “जून-जुलैमध्ये पवित्र पोर्टलद्वारे २५० ते ३०० कायमस्वरूपी शिक्षक शाळांना मिळणार आहेत,” असेही त्यांनी सांगितले. आयुक्त शेखर सिंह हे पालिकेतील शिक्षण विभागाला प्राधान्य देत मार्गदर्शन करीत असल्याबद्दल थोरात यांनी त्यांचे आभार मानले.