विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी महापालिका अग्रेसर: आयुक्त शेखर सिंह

0
337

‘संवाद आयुक्तांशी’ या उपक्रमांतर्गत आयुक्त शेखर सिंह यांनी फेसबुक लाईव्हद्वारे नागरिकांशी साधला संवाद

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कामकाज अधिक लोकाभिमुख व्हावे, यासाठी वेळोवेळी शहरातील विविध समाजघटकांशी संवाद साधला जातो. त्याचाच एक भाग म्हणून ‘संवाद आयुक्तांशी’ या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी आज सकाळी ११ वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला.

या कार्यक्रमामध्ये आयुक्त शेखर सिंह यांनी ‘कौशल्य विकास आणि शिक्षण’ या विषयावर मार्गदर्शन केले. शिक्षकांवरील कामाचा ताण हलका करण्यासाठी डेटा एन्ट्री ऑपरेटरची नियुक्ती करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या क्रीडा आणि कलागुणांना वाव देण्यासाठी क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असून मुलांचे मानसिक स्वास्थ्य सुदृढ राहावे, या करिता समुपदेशकांची मदत घेण्यात येणार आहे. बालवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील सर्व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, असे आयुक्त शेखर सिंह संवादावेळी सांगितले.

प्रसंगी, कार्यक्रमाच्या माध्यमातून आयुक्त शेखर सिंह यांनी नागरिकांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक,विद्यार्थी, पालक आणि नागरीकांकडून या कार्यंक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. कार्यक्रमासाठी नागरिकांकडून पीसीएमसी स्मार्ट सारथी अॅपच्या माध्यमातून प्रश्न मागविण्यात आले होते.

१) उषा जगताप : घरगुती छोटी दुरूस्ती, देखभाल उदा. मिक्सरला वॉशर लावणे, गॅसची फ्लेम मोठी होण्यासाठी देखभाल, पाण्याच्या टॅपचा वॉशर बदलणे यासाठी काही कोर्स आहे का?

  • आयुक्त्‍ शेखर सिंह:- आपण नमूद केलेले कोर्स हे टेक्निकल कोर्स असून सदरचे कोर्स हे मनपाचे आयटीआय मार्फत राबविले जातात. तसेच मनपाचे समाज ‍विकास विभागामार्फत फॅशन डिझायनर, टेलर, असिस्टंट ब्युटी थेरपिस्ट, मेक अप ट्रेनर, मेहंदी स्पेशलिस्ट, असिस्टंट हेअर स्टायलिस्ट, बाल संगोपन, बहू पाककृती कुक, हस्तनिर्मित सोने आणि रत्न सेट ज्वेलरी- फायनल क्युसी आणि निरीक्षण, फिटनेस ट्रेनर इत्यादी स्वंयरोजगार कोर्स राबविण्यात येतात.

२) सीए सुनील कारभारी : विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी महापालिकेच्या वतीने कोणते उपक्रम राबविण्यात येत आहेत? – आयुक्त शेखर सिंह :- 1) योगा प्रशिक्षण, आनंदी शिक्षण, माध्यमिक शाळेत MS-CIT प्रशिक्षण, मूल्यशिक्षण

 2) पर्यावरण शिक्षण - प्रत्येक शाळेत वृक्ष लागवड, सौर ऊर्जा, रेनवॉटर हार्वेस्टिंग उपक्रम

 3) महापालिकेच्या वतीने जल्लोष उपक्रम राबविण्यात आला. त्यातून पिंपरी चिंचवड शहराचे ऐतिहासिक,

     सांस्कृतिक महत्त्व सांगण्यात आले. या वेळी एक प्रदर्शनदेखील भरवण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या

     माध्यमातून शहराच्या समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला.

३) गणेश फुगे:- खासगी शैक्षणिक संस्थांकडून फी आकारणी बाबत काही मर्यादा किंवा नियम आहेत काय? असतील तर त्याबाबत लोकांच्या जनजागृती करण्यासाठी महापालिकेने काही काम केले आहे काय?

  • आयुक्त शेखर सिंह : होय, प्रत्येक शाळेला फी ठरवून दिलेली आहे. 2 वर्षांत 15% फी वाढवता येते. कोरोना काळात 80% शाळांनी 15% फी कमी केली आहे.

४) सुरज साळवे : महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षक संख्या वाढवावी.

  • आयुक्त शेखर सिंह : पिंपरी चिंचवड मनपा शाळेत मानधन तत्वावर 267 प्राथमिक, 165 माध्यमिक शिक्षकांची भरती करणेत आली आहे. प्रत्येक शाळेत डाटा एंट्री ऑपरेटर, समुपदेशक, कला व क्रीडा शिक्षकांची नेमणूक करणेत येत आहे.

५) बाबुराव खलसोडे: शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी कोणते प्रयत्न करण्यात येत आहेत?

  • आयुक्त शेखर सिंह : दर महिन्याला शिष्यवृत्ती कार्यशाळा घेण्यात येत आहे. शालेय साहित्याचे डीबीटी द्वारे वितरण करण्यात येत आहे. शिक्षक भरती, कला / कार्या. शिक्षक भरती सूरू आहे. क्यूसीआय मार्फत शाळा व विद्यार्थी ग्रेडेशन देण्यात येते. एलएफई व आकांक्षा मार्फत गुणवत्तापूर्ण शिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे. संतपीठामार्फत इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात येत आहे. ई-कचरा संकलन उपक्रम सुरू आहे. क्रिडा प्रबोधिनी कार्यशाळा राबविण्यात येत आहेत.

६) डी. पी. देशपांडे : महापालिकेच्या माध्यमातून कौशल्य विकास केंद्रे सुरु करता येऊ शकतील का?

  • आयुक्त शेखर सिंह : मनपा हददीतील विविध गरजू घटकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कोर्सेस राबविणेत आले आहेत / येत आहेत. तसेच लाईटहाऊस योजनेअंतर्गत सुरु असलेल्या लाईटहाऊस केंद्र – पिंपरी, निगडी, चिंचवड मार्फत पुढील कोर्सेस राबविणेत येतात – ऑफिस अॅडमिनिस्ट्रेशन, फायनान्शियल आकाउंटिंग विथ टॅली, डिजिटल मार्केटिंग, वेब डेव्हलपमेंट, ग्राफिक डिझायनिंग, मोबाईल रिपेअरींग, जावा, सॉफ्टवेअर टेस्टिंग, अँग्युलर, पायथॉन, फुल स्टॅक डेव्हलपर, क्लाउड कॉम्प्युटिंग, कॉम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंग ऍण्ड मोबाईल, लॅपटॉप रिपेअरिंग, नर्सिंग, एसी रिपेअरिंग, फॅशन डिझाईन, ब्युटी पार्लर, मेकअप आर्टिस्ट या कोर्सेसद्वारे मनपा हददीमध्ये राहणा-या १८ ते ३५ वयोगटातील युवक व युवतींना लाईट हाऊस मार्फत विविध स्किलिंग उपक्रम राबविण्यात येतात.

७) अॅड. विशाल डोंगरे : मनपाच्या विविध विभागांमार्फत चालवल्या जाणार्‍या कौशल्य विकास योजना या महापालिका हद्दीतील शासनाच्या एमएसएसडीसी/एनएसडीसी मान्यताप्राप्त संस्था यांच्या मार्फत घेण्यात यावेत. जिल्हा कौशल्य विकास विभाग यांच्या सहकार्याने/सल्ल्याने प्रशिक्षण विषय निवडावेत जेणे करून खरा गरजू योग्य लाभ होईल, यावर आपले मत.

  • आयुक्त शेखर सिंह : समाज विकास विभागामार्फत राबविणेत येणारी कौशल्य प्रशिक्षण योजना ही शासनाच्या एनएसडीसीचे मार्गदर्शक तत्वांप्रमाणे राबविणेत येते. तसेच सदर कामकाजाकरीता नियुक्त केलेली संस्था ही एनएसडीसी मान्यताप्राप्त संस्था आहे.

८) प्रश्न : शहरात झुंज दिव्यांग संस्था व प्रशिक्षण केंद्र: दिव्यांग बांधवांसाठी कला कौशल्य उपक्रम राबविणेत यावे.

आयुक्त शेखर सिंह : दिव्यांग बांधवांसाठी कौशल्य उपक्रम राबविणेबाबतची कार्यवाही प्रस्तावित असून विविध कंपन्यांकडून ईओआय मागविण्यात आलेले आहेत.

९) आलोक अडसूळ : शाळेच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस बंदी घालण्यावर काय कारवाई केली?.

आयुक्त शेखर सिंह : तंबाखू मुक्त अभियानाच्या अंतर्गत प्राथमिक शाळेच्या आवारात तंबाखू विक्रीला बंदी घालण्यात आली आहे.