विद्यार्थी विकसित भारताचे भविष्य – आमदार शंकर जगताप

0
1

सचिन साठे सोशल फाऊंडेशन तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न; उपक्रमाचे २१वे वर्ष.

पिंपरी, दि. १६ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करण्याचा संकल्प केला आहे. आजचे पुरस्कार प्राप्त विद्यार्थी हे उद्याच्या विकसित भारताचे भविष्य आहे. गेल्या २१ वर्षांपासून पिंपळे निलख येथील सचिन साठे सोशल फाऊंडेशन विद्यार्थ्यांचा व समाजातील मान्यवरांचा गुणगौरव करून समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम राबवीत असून ही अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी केले.

सचिन साठे सोशल फाऊंडेशनतर्फे इयत्ता दहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभ शुक्रवारी (१५ ऑगस्ट) उत्साहात पार पडला. यावेळी भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी आमदार अश्विन जगताप, प्रा. गणेश शिंदे आदी उपस्थित होते.

इयत्ता दहावी बारावी मध्ये विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी तसेच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचे कौतुक केले पाहिजे. या आदर्श विद्यार्थी, व्यक्तीमुळे इतरांना प्रेरणा मिळते. म्हणून हा गौरव समारंभ आयोजित केला जातो, असे सचिन साठे म्हणाले.

शत्रुघ्न काटे म्हणाले, हा गुणगौरव सोहळा विद्यार्थ्यांच्या प्रगतीला प्रोत्साहन देणारा आणि समाजात सकारात्मकतेचा संदेश देणारा आहे. विद्यार्थ्यांनी चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर हे यश संपादन केलेले आहे. त्यासाठी काटेकोर मेहनत, वेळेचे नियोजन ही विद्यार्थ्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे.

विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान हा त्यांच्यासाठी मोठी प्रेरणा असून, मला या सोहळ्याचा एक भाग होता आले याचा आनंद आहे, असे श्रेया बुगडे म्हणाल्या.

पुरस्कारार्थी खालील प्रमाणे –
स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप स्मृती पुरस्कार (इयत्ता बारावी प्रथम क्रमांक – रू. १५,५५५ रोख व सन्मानचिन्ह) वरद मनीष गुप्ता तर , स्व. सुरज काळूराम नांदगुडे स्मृती पुरस्कार (इयत्ता दहावी प्रथम क्रमांक – रू‌ ११,१११ रोख व सन्मानचिन्ह) अवनी सचिन गुंड हिला प्रदान करण्यात आला. तसेच ८५% पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना स्मार्टवॉच, सन्मानचिन्ह आणि स्कूल बॅग प्रदान करण्यात आली.
तर इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व स्कूल बॅग देऊन गौरव करण्यात आला.

प्रमुख अतिथींच्या हस्ते परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर विष्णुपंत अर्जुन इंगवले, डॉ. राजेंद्र सयाजी कोकणे, बाळासाहेब जगताप, अनंतराव कस्पटे, दत्तात्रय किसन इंगवले, बाळासाहेब करंजुले, सुरेश काशिनाथ चव्हाण, डॉ. संदीप लूनावत, डॉ. संदीप पाटील, माणिक कुटे, सचिन बडगे, संजय काळूराम दळवी, सोमनाथ बाळासाहेब इंगवले, गणेश पंडितराव साठे, अशोक बनसोडे, मैत्री ग्रुप (पिंपळे निलख), शौर्य विशाल इंगवले, डॉ. विजय पाटील (गायन ग्रुप, विशाल नगर), आर्या गवळी यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन सचिन मुरलीधर साठे व सचिन साठे सोशल फाऊंडेशन यांनी केले. कार्यक्रमास परिसरातील विद्यार्थी, पालक, नागरिक उपस्थित होते.