विद्यार्थी, पालकांकडून रहिवासी क्षेत्रामध्ये वाहनांचे पार्किंग; नागरिकांची जनसंवाद सभेत तक्रार

0
159

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – शहरातील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करावेत. शाळा, महाविद्यालयातील येणारे विद्यार्थी, पालक हे नो-पार्किंग तसेच रहिवासी क्षेत्रामध्ये वाहनांचे पार्किंग करीत आहेत. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. विद्यार्थी, पालक यांच्या वाहनांच्या पार्किंगची सोय संबंधित संस्थेच्या आवारात करण्याबाबत संबंधित संस्थेला सूचना द्याव्यात. रहिवासी क्षेत्रात पथविक्रेते, फेरीवाले यांच्याद्वारे कर्णकश ध्वनींच्या भोंग्याचा वापर करून आरोळी दिली जाते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांच्या कानांवर परिणाम होत आहे, अशा भोंग्याच्या आवाजाची पातळी निश्चित करावी, अशा विविध मागण्या नागरिकांनी आज (सोमवारी) झालेल्या जनसंवाद सभेत केल्या.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयात महिन्यातील दुस-या व चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज (सोमवारी) जनसंवाद सभा पार पडली. या जनसंवाद सभेत 78 नागरिकांनी सहभाग घेऊन तक्रारवजा सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे 17, 13, 7, 7, 5, 2, 13 आणि 14 नागरिकांनी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले. महापालिकेच्या वतीने शहरात विविध विकासात्मक कामे करण्यासाठी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आर्थिक तरतूद केली जाते, नव्या आर्थिक वर्षासाठी नव्याने सादर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात नागरिकांनी सूचित केलेल्या विकासकामांबाबत आर्थिक तरतूद करण्यात यावी, अशी सूचनाही नागरिकांनी महापालिकेला केली.

अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह, या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता मनोज सेठिया, सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, समाज विकास विभागाचे उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, आरोग्य विभागाचे उप आयुक्त अजय चारठाणकर, भूमी व जिंधगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी यांनी भूषवले. तसेच क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, सोनम देशमुख, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सीताराम बहुरे, शीतल वाकडे, विजयकुमार थोरात हे उपस्थित होते. आठही क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत स्थापत्य, जलनि:स्सारण, पाणीपुरवठा, विद्युत, नगररचना विभागांचे कार्यकारी अभियंता, उद्यान, वैद्यकीय, आरोग्य, करसंकलन या विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आज झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी व सूचना मांडल्या, उद्यानातील मोडकळीस आलेली झाडे, झाडांच्या फांद्या छाटण्यात यावेत. उद्यानामध्ये लहान मुलांसाठी खेळणी बसविण्यात यावी तसेच ओपन जिम मधील नादुरुस्त साहित्य दुरुस्त करण्यात यावे, शहरातील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करण्यात यावेत, पिंपरी येथील भाजी मंडई येथे पथारीवाला, फेरीवाला सर्वेक्षण करण्यात यावे, शाळा, महाविद्यालयातील येणारे विद्यार्थी, पालक हे नो पार्किंग तसेच रहिवासी क्षेत्रामध्ये वाहनांचे पार्किंग करीत आहेत, त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे, विद्यार्थी, पालक यांच्या वाहनांच्या पार्किंग ची सोय संबंधित संस्थेच्या आवारात करण्याबाबत संबंधित संस्थेला सूचना द्याव्यात, रहिवासी क्षेत्रात पथविक्रेते, फेरीवाले यांच्याद्वारे कर्णकश ध्वनींच्या भोंग्याचा वापर करून आरोळी दिली जाते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांच्या कानांवर परिणाम होत आहे, अशा भोंग्याच्या आवाजाची पातळी निश्चित करावी व नियंत्रण करावे. वेळोवेळी उद्यानाची स्वच्छता करण्यात यावी.

ड्रेनेज वाहिन्या दुरुस्त करण्यात याव्यात, रस्त्यांची दुरुस्ती करावी, जुने झालेल्या सार्वजनिक शौचालयांचे नुतनीकरण करण्यात यावे, उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांना दंड करावा, अनधिकृत बांधकाम व पत्राशेडवर निष्कासनाची कारवाई करण्यात यावी, नागरिक शहरातील नदीवरील पुलांवरून निर्माल्य व कचरा नदीमध्ये टाकत आहेत, त्यामुळे नदी प्रदूषण वाढत असून पुलावर उंच जाळ्या बसविण्यात यावेत, अशा सूचना वजा तक्रारी आज झालेल्या जनसंवाद सभेमध्ये नागरिकांनी मांडल्या.