गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न; ५५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व करिअर मार्गदर्शन.
पिंपळे सौदागर, दि. ७ : “१०वी आणि १२वी हे विद्यार्थी दशेतले आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे टप्पे आहेत. हे केवळ परीक्षेचे निकाल नसून, आपल्या पुढील आयुष्याची दिशा ठरवणारे क्षण आहेत. या टप्प्यावर घेतलेला प्रत्येक निर्णय आपल्या भविष्याचा पाया रचतो,” असे प्रतिपादन भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी केले. पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरातील १०वी आणि १२वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आज सकाळी १० वाजता बासुरी बँक्वेट हॉल, हॉटेल गोविंद गार्डन, पिंपळे सौदागर येथे भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन सेमिनारचेही यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक आणि भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला देत ते म्हणाले, “यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो. कठोर परिश्रम आणि सातत्य हेच यशाची गुरुकिल्ली आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी असते, त्यातून शिका आणि नव्या जोमाने पुन्हा प्रयत्न करा.”
या समारंभात २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात एसएससी, एचएससी, सीबीएससी आणि आयसीएसई बोर्डांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ५५० विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्रत्येक बोर्डामधून पहिले तीन क्रमांक पटकावणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना विशेष भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये सायकल, ट्रॉफी, गुड्डी बॅग, नोटबुक, पेन आणि प्रमाणपत्र यांचा समावेश होता. याव्यतिरिक्त, कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनाही गुड्डी बॅग, नोटबुक, पेन आणि प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहन देण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात, बाकलीवाल ट्यूटोरियल्सचे संचालक आणि आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी वैभव बाकलीवाल यांनी विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन केले. त्यांनी विविध करिअर संधी, योग्य शाखा निवडण्याचे महत्त्व आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांबद्दल सखोल माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचे निरसन करत त्यांनी योग्य मार्गदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविला.
याप्रसंगी बोलताना शत्रुघ्न (बापू) काटे यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. काटे यांनी कौशल्य विकास, सामाजिक भान आणि आरोग्याचे महत्त्व यावरही भर दिला. “तुम्ही उद्याचे नागरिक आहात. समाजाप्रती तुमची काहीतरी जबाबदारी आहे. शिक्षणाचा उपयोग केवळ स्वतःच्या प्रगतीसाठी नव्हे, तर समाजाच्या भल्यासाठीही करा,” असे सांगत शेवटी, त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि ती पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमामुळे आमच्यात खूप आत्मविश्वास वाढला आहे. आम्हाला भविष्यात काय करायचं, कोणत्या दिशेने जायचं, याची योग्य दिशा मिळाली आहे. हा सत्कार समारंभ आणि करिअर मार्गदर्शन सेमिनार आमच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक जीवनासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला, असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी यावेळी दिली.
यावेळी भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे,जयनाथ काटे,ऍड. राजाभाऊ जाधव,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे विभाग कार्यवाह मुकुंदजी कुलकर्णी,प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे,भानुदास काटे पाटील,अनिता काटे,वैभव बकलीवाल,वसंत काटे,महेश लोणारे, विबगेयोर स्कुल प्रिंसिपल मीनाक्षी मेस्त्री,अरुण चाबुकस्वार, संदीप काटे,राजेश पाटील,विजूदादा धनवटे,पोपट काटे,विजय काटे,प्रवीण कुंजीर,बाळकृष्ण परघळे,मनोज ब्राम्हणकर,योगेश मिश्रा,सुप्रिया पाटील,दिपक गांगुर्डे,विजय पाटील,शितल पटेल, सुशील भाटिया,श्री सुनील उपाध्याय तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उषा भारद्वाज आणि सागर बिरारी यांनी केले.