विद्यार्थी जिवनापासून ध्येय बाळगल्यास यश निश्चित मिळते – अधिष्ठाता नरेंद्र देवरे

0
296

खान्देश मराठा पाटील समाज संघाच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

पिंपरी, दि.६ (पीसीबी) :- विद्यार्थी जिवनापासून ध्येय बाळगल्यास आयुष्यात यश निश्चित मिळते, यासाठी अभ्यासात चिकाटी व जिदद असायला हवी, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इं जिनिअरींगचे अधिष्ठाता नरेंद्र देवरे यांनी व्यक्त केले. खान्देश मराठा पाटील समाज संघाच्यावतीने सन २०२१-२२ वर्षीच्या १० व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थी यांचा गुणगौरव समारंभ दि. ४ सप्टेंबर २०२२ रोजी चिंचवड येथील चैतन्य सभागृहात उत्साहात पार पडला. त्यावेळी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रसंगी, ५० विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व पिंपरी चिंचवड मनपाचे माजी आयुक्त श्री. राजेश पाटील लिखीत “ताई, मी कलेक्टर व्हयनू” हे पुस्तक देवून गौरव करण्यात आला.

यावेळी, टीसीएस कंपनीचे ग्लोबल हेड प्रवीण भामरे, माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, सचिन चिंचवडे, सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे, माऊली सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

टीसीएस कंपनीचे ग्लोबल हेड प्रवीण भामरे म्हणाले की, आजच्या स्पर्धात्मक युगात कुठल्याही क्षेत्रात यश संपादन करायचे असेल तर अभ्यासासोबत कष्टाची जोड द्यायला हवी. तंत्रज्ञानामुळे जवळ आले असून त्याचा आवश्यक त्या ठिकाणी फायदा घ्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.

माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, विद्यार्थी जिवनात अनेक प्रसंग येतात, त्याचा सामना करायला हवा. कठीण प्रसंगातून यश गाठलेल्या लेखकांची पुस्तके वाचनाची आवड निर्माण करून एखाद्या पुस्तकात जग आपली दखल घेईल, यावर लक्ष केंद्रीत करावे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, गुणवंत विद्यार्थी व पालकांनी मनोगत व्यक्त करून मंडळाचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रम संयोजनासाठी उद्योजक शरद पाटील, पंकज निकम, मोतीलाल भामरे, ‍शिवाजी पाटील, शंकर पाटील यांच्यासह मंडळाचे सदस्य व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. सुत्रसंचालक सचिव शंकर पाटील तर आभार सुप्रिया पाटील यांनी मानले.