विद्यार्थी, कामगारांची गैरसोय होतेय, दुपारीही लोणावळा-पुणे लोकल सेवा सुरु ठेवा

0
218

लोणावळा, चिंचवड स्टेशनचे आधुनिकीकरण करा
शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे मागणी

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – लोणावळा-पुणे या मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत रेल्वे धावत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यी, कामगारांची मोठी गैरसोय होत आहे. त्यांना 4 वाजेपर्यंत रेल्वेची वाट बघत थांबावे लागत आहे. त्यात त्यांचा वेळ जातो, अभ्यासही बुडतो. त्यासाठी 10 ते 4 या वेळेतही रेल्वे गाड्या सुरु कराव्यात. जेणेकरुन कामगारांसह विद्यार्थ्यांची सोय होईल. त्याचबरोबर पर्यटणस्थळ असलेल्या लोणावळा आणि चिंचवड रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण करावे. मॉडर्न वर्ल्ड क्लास स्टेशन बनवावेत, अशी महत्वपूर्ण मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली.

याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची खासदार बारणे यांनी भेट घेतली. लोणावळा-पुणे रेल्वेसेवा पूर्ण क्षमतेने चालू नसल्याचे विद्यार्थी, कामगारांचे होत असलेली गैरसोय त्यांनी सांगितली. त्यावर याबाबत तत्काळ निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही रेल्वेमंत्र्यांनी दिली. खासदार बारणे म्हणाले, कोरोनापूर्वी लोणावळा-पुणे या मार्गावर दिवसभर लोकल ट्रेन धावत होत्या. कोरोना काळात रेल्वेसेवा बंद केली होती. आता परिस्थिती पूर्वपदावर आल्याने सर्व रेल्वेगाड्या पूर्णपणे सुरु आहेत. परंतु, मावळ लोकसभा मतदारसंघातील लोणावळा-पुणे दरम्यानच्या मार्गावर सर्व लोकल रेल्वे गाड्या धावत नाहीत.

सध्या लोणावळा-पुणे दरम्यान सकाळी 10 च्या अगोदर लोकल रेल्वे धावतात. त्यानंतर दुपारी 4 वाजेपर्यंत एकही रेल्वे धावत नाही. त्यामुळे या मार्गावरुन मोठ्या संख्येने प्रवास करणारे विद्यार्थी, सरकारी कर्मचारी, कामगार, औद्योगिक पट्टा असलेल्या तळेगावदाभाडे, पिंपरी-चिंचवड भागातील सेकंड शिफ्ट केलेल्या कामगारांची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांना 4 वाजेपर्यंत लोकलची वाट बघावी लागते. विद्यार्थ्यांचा वेळ जातो. अभ्यासही होत नाही. शिफ्ट संपल्यानंतरही लोकलअभावी कामगारांनाही ताटकळत थांबावे लागते. विविध अडचणींचा सामना करावा लागतो. खासगी बस, पीएमपीएमलचा प्रवास महागडा आहे. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यासाठी सकाळी 10 ते दुपारी 4 या दरम्यानच्या कालावधीतही रेल्वेची लोकल सेवा सुरु करावी. गाड्यांच्या फे-या वाढवाव्यात अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.

लोणावळा, चिंचवड स्टेशनचे आधुनिकीकरण करा
मावळ लोकसभा मतदारसंघात येत असलेले लोणावळा शहर देशातील मोठे पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी देश, विदेशातून लाखो पर्यटक लोणावळ्यात येतात. लोणावळ्यात भुशी धरण, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट, राजमाची किल्ला अशी अनेक सुंदर ठिकाणी, आकर्षणाचे केंद्र आहेत. येथे वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते. परिणामी, पार्किंगची समस्या उद्भवते. त्याचबरोबर चिंचवड स्टेशनही प्रसिद्ध रेल्वे स्थानक आहे. क्रांतिकारक चापेकर बंधु आणि श्रीमान् महासाधू श्री मोरया गोसावी यांची जन्म आणि कर्मभूमी चिंचवड आहे. त्यामुळे चिंचवडला ऐतिहासिक आणि अध्यात्माचा मोठा वारसा लाभला आहे. याठिकाणीही हजारो पर्यटक चापेकर वाडा पाहण्यासाठी आणि मोरयांच्या दर्शनासाठी येतात. चिंचवड स्टेशनवर सुविधांची कमतरता आहे. त्यामुळे या दोनही स्टेशनचे आधुनिकीकरण करावे. मॉडर्न वर्ल्ड क्लास रेल्वे स्टेशन तयार करावेत, अशी मागणीही खासदार बारणे यांनी केली.