विठोबाचे पदस्पर्श दर्शन सुरू

0
214

पंढरपुर, दि. २ (पीसीबी) – पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील जतन आणि संवर्धनाच्या कामानंतर तब्बल 79 दिवसांनंतर रविवारी (2 जून 2024) विठोबाचे पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात आले आहे. मंदिराचे पुरातन आणि प्राचीन रूप भाविकांना अनुभवायला मिळत आहे. विठुरायाचे पदस्पर्श दर्शन थेट होत असल्याने भाविकांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसत आहे. रविवारी (2 जून 2024) पहाटे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक आणि दर्शन रांगेतील पहिले मानाचे वारकरी बालाजी मुंडे यांच्या उपस्थितीत विठोबाची महापूजा झाली. या महापूजेनंतरच पदस्पर्श दर्शनास सुरुवात करण्यात आली.

79 दिवसांनंतर भाविकांना विठोबाचे पदस्पर्श मिळणार असल्याने मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. भाविकांनी देखील रात्रीपासूनच मंदिरामध्ये गर्दी केली आहे. विशेष म्हणजे विठ्ठलाचे दर्शन सुरू होत असताना 700 वर्षांपूर्वीचे जसेच्या तसे प्राचीन मंदिर पाहून भाविक समाधान आणि आनंद व्यक्त करताहेत. विठ्ठलाचे परस्पर्श दर्शन सुरू झाल्यानंतर रांगेमध्ये असणाऱ्या भाविकांचा उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसून आला. हरिनामाचा जयघोष, चेहऱ्यावर असणारी विठुरायाच्या दर्शनाची आस आणि टाळ्यांचा गजर, अशा प्रसन्न वातावरणात विठोबाच्या दर्शनास सुरुवात झाली.

विठ्ठल पदस्पर्श दर्शन सुरू करण्यापूर्वी दर्शन रांगेतील पहिले वारकरी असणारे तेलंगणा येथील भाविक बालाजी मुंडे यांना मानाचा वारकरी म्हणून पूजेचा बहुमान मिळाला. जन्मोजन्मी आम्हाला वारी मिळू दे आणि विठ्ठलाचे दर्शन घडू दे…अशी भावना या मानाच्या वारकऱ्याने पूजेनंतर व्यक्त केली.