विजयाचा गुलाल नाय उधळला तर फाशी घेऊन मरेन… ; शहाजीबापूचं संजय राऊतांना ओपन चॅलेंज

0
78

मुंबई, दि. 23 (पीसीबी) : सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांना पुन्हा एकदा विधानसभेचं तिकीट मिळालं आहे. शिंदे गटाने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे. शिवसेनेत झालेल्या बंडावेळी गुवाहाटीला गेलेल्या सगळ्या आमदारांना शिंदे गटाकडून तिकीट मिळालं आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना शहाजीबापू यांनी मोठं विधान केलं आहे. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसंच, विजयाचा गुलाल उधळला नाही, तर फास घेऊन मरेन, असंही ते म्हणाले आहेत.

आज शहाजीबापू यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलंय. “संजय राऊत हे राज्यातील भुकणारा कुत्रा असून माझ्याविरोधात संजय राऊत, त्याचा बाप, आजा यांनी एक नाही तर दहा सभा घेऊ देत, मी त्याला पालथा पाडून तुडवून पुढे जाऊन दाखवणार”, असा इशारा शहाजीबापू यांनी दिला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणतंच व्हीजन नाहीये. माझ्यावर टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरे मुद्देच नाहीत. आज संजय राऊतांना सांगतो, तुम्ही सात-आठ सभा घ्या, मी विजयाचा गुलाल उधळला नाही, तर फास घेऊन मरेन, असंही शहाजीबापू म्हणाले आहेत. त्यांचं हे वक्तव्य आता चर्चेत आलं आहे.

दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच काल पुण्यात खेड-शिवापूर टोलनाक्यावर नाकाबंदी दरम्यान पोलिसांना एका कारमध्ये तब्बल 5 कोटी रुपये रोकड आढळून आली. ही रक्कम सत्ताधारी आमदाराच्या गाडीतून सापडल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. तसेच, त्यांनी अप्रत्यक्षपणे शहाजीबापू यांना टार्गेट केलं होतं. यावरच शहाजीबापू यांनी आता प्रत्युत्तर दिलं.