दि.२९ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत त्यांचे बॅनर लावले होते. यावरून बीडमध्ये झालेल्या ओबीसी समाजाच्या बैठकीत लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. ओबीसींच्या दारात आले तर दंडुका हातात घेणार, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले होते. यानंतर बीडच्या गेवराईमध्ये ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित समर्थकांमध्ये राडा झाला होता. यानंतर लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडित यांनी एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला होता. आता विजयसिंह पंडित यांनी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या मुंबईतील आझाद मैदानावरील उपोषणाला हजेरी लावली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदानावर भेट घेतली. तिघांमध्ये काही काळ चर्चा देखील करण्यात आली. मनोज जरांगे यांच्या भेटीनंतर संदीप क्षीरसागर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मनोजदादांच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा आहे. ज्या गोष्टी राहिल्या त्यासाठी ते आंदोलनाला बसलेत आता पुढे काय होते ते बघू. लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, मी त्यांच्यासोबत आहे, असी त्यांनी म्हटले आहे. तर प्रकाश सोळंके यांनी सरकारने ठाम भूमिका घेण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
गरजू मराठ्यांसाठी हे आंदोलन आहे. याबाबत अजित पवार सुद्धा सकारात्मक आहेत. ते उपमुख्यमंत्री म्हणून आपली भूमिका मांडतील, असेही त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी लक्ष्मण हाके यांच्याबाबत विचारले असता हाके यांचं नावं घेऊ नका. आधीच वातावरण दूषित झालं आहे. अजून वातावरण बिघडवू नका. ते काय म्हणतात याला लक्ष मी देत नाही, असे म्हणत त्यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर हल्लाबोल केलाय.