विजय जगताप लिखित प्रा. रामकृष्ण मोरे ‘परामर्श एका शिल्पकाराचा’ पुस्तकाचे प्रकाशन
पिंपरी, पुणे (दि. २९ जून २०२३) राजकीय जीवनामध्ये प्रा. रामकृष्ण मोरे यांचे साहित्य, संस्कृती चित्रपट, कला तसेच समाजसेवा याविषयीचे विचार पक्के होते. त्यामुळेच प्रा. मोरे यांनी सर्वच क्षेत्रात लीलया मुशाफिरी केली आणि आपल्या कार्य कतृत्वाचा ठसा उमटवला. सध्याच्या राजकीय सामाजिक परिस्थिती पाहता विचार शून्यता ही मोठी समस्या आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या जीवनावरील ‘परामर्श एका शिल्पकाराचा’ ज्येष्ठ पत्रकार विजय जगताप लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आकुर्डी येथे करण्यात आला. यावेळी नितीन गडकरी बोलत होते. प्रकाशन समारंभास काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह, ज्येष्ठ नेते उल्हास दादा पवार, पीसीईटी विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे, ज्येष्ठ साहित्यिक आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डॉ.गजानन एकबोटे, लेखक विजय जगताप, अंशुल प्रकाशनच्या संचालिका तृप्ती जगताप,राजीव जगताप आदी उपस्थित होते.
गडकरी पुढे म्हणाले की तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे पूर्वी तंत्रज्ञान विकसित नव्हते परंतु आता याच तंत्रज्ञानाचा वापर करून आपण अत्याधुनिक सोयी सुविधा यांचा लाभ घेऊ शकतो त्यातून नव्या पिढीला ज्येष्ठ विचारवंत प्रतिभावंतांचे मार्गदर्शन मिळू शकते त्याचे दस्ताऐवजी करण होऊ शकते असे गडकरी यांनी सांगितले.दिग्विजय म्हणाले की, प्रा. मोरे यांचे व्यक्तिमत्व प्रभावशाली होते. पिंपरी चिंचवड शहराच्या विकासामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे.शिक्षण क्षेत्रातही त्यांनी चांगले कार्य केले. व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. काँग्रेसचे दुर्भाग्य की त्यांचा लवकर मृत्यू झाला महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची मोठी हानी झाली.
यावेळी हर्षवर्धन पाटील, डॉ. सदानंद मोरे यांनी ही मनोगत व्यक्त केले.लेखक विजय जगताप यांनी पुस्तक लिहिण्यामागची भूमिका विशद केली.स्वागत उल्हासदादा पवार यांनी केले. सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी तर आभार मंदार चिकणे यांनी आभार मानले.