विखे ज्या पक्षात जातात त्याच पक्षाच्या विरोधात काम करतात; भाजप आमदाराचा खोचक टोला

0
329

जामखेड, दि. १७ (पीसीबी) – जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे शरद कार्ले यांची ईश्वर चिठ्ठीने निवड झाली. मात्र जरी भाजपच्या ताब्यात बाजार समितीच्या चाव्या आल्या असल्या तरी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार राम शिंदे यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. सुजय विखे पाटील यांचे पीए आणि कार्यकर्त्यांनी भाजप आमदार राम शिंदे यांच्या पॅनलच्या विरोधात उमेदवार उभे केल्याने राम शिंदे यांनी विखेंवर जोरदार टीका केली आणि याबाबत पक्षश्रेष्ठींना अहवाल सादर करणार असल्याचे शिंदे म्हणाले. सोबतच विखे ज्या पक्षात जातात त्याच पक्षाच्या विरोधात काम करतात हे ऐकलं होतं, आता त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला असंही राम शिंदे म्हणाले.

“रोहित पवार आणि सुजय विखे पाटील यांच्या एकत्रित पॅनलेच उमेदवार उभे होते. आम्ही दीड महिना कुठेही भाष्य केलं नाही. शेवटच्या क्षणी का होईना आम्ही सत्तेत आहोत. आमचे खासदार आहेत, मंत्री आहेत, आमची देशात आणि राज्यात सत्ता आहे. अनेक लोक सांगतात की हे ज्या पक्षात जातात, त्यांच्याविरोधात काम करतात. त्याचा प्रत्यय मला आला,” असं आमदार राम शिंदे म्हणाले.

सभापती भाजपचा तर उपसभापती राष्ट्रवादीचा
राज्यात लक्षवेधी ठरलेल्या जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाव्या भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. 1960 साली स्थापन झालेल्या जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा पहिल्यांदाच समसमान जागा मिळाल्याने ही निवडणूक चांगलीच चुरशीची ठरली. बाजार समितीच्या निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नसल्या तरी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपचे आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यामध्ये सरळ लढत झाली. विशेष म्हणजे कर्जत जामखेड मतदारसंघातील दोन्ही बाजार समितीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी यांना 9-9 जागा मिळाल्या. कर्जत बाजार समितीमध्ये सेवा सोसायटीतील दोन उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केल्याने तिथलं सभापतीपदही फेरमतमोजणीनंतरच ठरणार होतं. मात्र जामखेडमध्ये राजश्री जाट या चिमुकलीने ईश्वर चिठ्ठी काढून सभापतीपदाची माळ ही भाजपचे शरद कार्ले यांच्या गळ्यात पडली तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कैलास वराट यांची वर्णी लागली.