विकास आराखड्यावर आठवड्यात ८००० हरकती

0
24

– एचसीएमटीआर प्रकल्पाविरोधात हरकतींची बरसात!
पिंपरी, दि. २८ – पिंपरी चिंचवड शहर विकास आराखड्यावर अवघ्या आठवड्यात तब्बल ८००० वर हरकती, सुचना आल्या आहेत. सर्वाधिक हरकती एचसीएमटीआर प्रकल्पाच्या विरोधात असल्याचे सांगण्यात आले. प्रारूप विकास आराखड्याचे नकाशे पाहण्यासाठी खुले करण्यात आले. १४ मे पासून ६० दिवसांत हरकती, सुचना नोंदविण्याची मुदत आहे. महापालिकेच्या क्षेत्रासह पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून वर्ग केलेल्या एकत्रित प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे. नकाशा महापालिका भवनातील सभागृहात खराळवाडी, नियोजन प्राधिकरण कार्यालयात उपलब्ध आहे.
महापालिकेने विकास आराखडा तयार करताना एमआयडीसी आणि पीएमआरडीएचे क्षेत्र वगळण्यात आले आहे. आराखड्यात शहरातील विविध प्रकल्पांसाठी आरक्षणे टाकण्यात आली आहेत. त्याबाबत नागरिकांकडून १६ मेपासून ६० दिवसांच्या हरकती व सूचना मागविल्या आहेत. संकेतस्थळावरही नकाशा पाहता येतो. विकास आराखड्यामध्ये पुररेषेमध्ये फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला आहे तर दुसरीकडे बासनात गुंडाळलेला रिंगरोड प्रकल्प पुनर्जीवित करण्यात आल्याने नाराजी वाढत आहे.
आरक्षणाबाबत विरोधाभास
आरक्षण टाकताना बडे राजकारणी, बिल्डर आणि धनिकांच्या जागा वगळण्यात आल्या आणि सामान्य शेतकरी, कष्टकरी यांच्या घरांवर आरक्षणे टाकल्याने संतापाची भावना आहे. शहरातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात विविध आरक्षणे टाकण्यात आली आहेत. काही ठिकाणचे आरक्षण परस्पर रद्द करण्यात आले. बांधकाम परवानगी घेऊनही त्या ठिकाणी आरक्षण टाकल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्या आरक्षणांना आक्षेप घेत आतापर्यंत एकूण ८००० हरकती महापालिकेकडे आल्या आहेत. त्यात सर्वाधिक हरकती चिखली तसेच एचसीएमटीआर (रिंग रोड) प्रकल्पाबाबत आहेत.