पिंपरी, दि. १३- “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर विकसित भारताच्या वाटचालीत ज्येष्ठांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरणार आहे!” असे विचार भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी श्री केदारेश्वर मंदिर प्रांगण, पेठ क्रमांक २४, निगडी प्राधिकरण येथे शुक्रवार, दिनांक १२ एप्रिल २०२४ रोजी व्यक्त केले. प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ आणि श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी नूतन वर्षानिमित्त मनोमिलन समारंभ २०२४चे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात खासदार श्रीरंग बारणे, विधानपरिषद आमदार उमा खापरे, भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव अमित गोरखे, पिंपरी – चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर आर. एस. कुमार, अनुप मोरे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, भारती फरांदे, ह. भ. प. किसनमहाराज चौधरी, सलीम शिकलगार, सरिता साने, शैला पाचपुते, राधिका बोर्लीकर, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष डॉ. अर्चना वर्टीकर, श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजू मोरे, मुख्य संयोजक चंद्रकांत उर्फ बाळा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शंकर जगताप पुढे म्हणाले की, “आपण ज्येष्ठ नागरिकांचे ऋण कायम मान्य केले पाहिजे. त्यासाठी मनोमिलन हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. ज्येष्ठांची जुनीजाणती, अनुभवी पिढी आणि ऊर्जा असलेली तरुण पिढी यांच्या विचारांची युती ही समाज आणि पर्यायाने देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यावश्यक आहे. मनोमिलनासारख्या उपक्रमातून ते उद्दिष्ट निश्चितच साध्य होईल!” खासदार श्रीरंग बारणे यांनी उपस्थितांना संबोधित करताना, “भारत हा जगाच्या पाठीवरील सर्वात मोठा लोकशाहीप्रधान देश आहे. हा लौकिक कायम ठेवण्यासाठी मतदान करणे हे आपले नैतिक आणि आद्य कर्तव्य आहे. संविधानाने नागरिकांना मतदानाचा हक्क अन् अधिकार प्रदान केला आहे!” असे आवाहन केले. उमा खापरे यांनी, “विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुलांवर संस्कार घडविणारे आजी – आजोबा बर्याच घरात आढळून येत नाहीत; परंतु ज्येष्ठ नागरिक संघांच्या माध्यमातून ही उणीव काहीशी भरून काढता येते!” असे मत मांडले.
याप्रसंगी मुख्य संयोजकांच्या वतीने प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाला ₹५१०००/- (रुपये एकावन्न हजार फक्त) चा धनादेश सुपुर्द करण्यात आला. सूर्यकांत मुथियान यांनी उपस्थित नागरिकांना लोकशाही परंपरा अखंडित ठेवण्यासाठी निर्भयपणे आणि कोणत्याही प्रलोभन अन् दबाव यांना झुगारून मतदान करण्याची शपथ दिली.
कार्यक्रमाच्या संयोजनात चक्रव्यूह मित्रमंडळ, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ आणि श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्ट यांच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. अक्षय मोरे यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रकांत उर्फ बाळा शिंदे यांनी आभार मानले.