वाहनांच्या वाढत्या वापरामुळे शहराच्या हवेतील ‘सल्फरडाय ऑक्साईड’चे प्रमाण वाढले!

0
357

पिंपरी दि. ४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील वाहनांच्या वाढत्या वापरामुळे हवेतील सल्फर डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढले आहे. शहराच्या विविध परिसरातील वायूप्रदूषण तपासणी करण्यात आली आहे.  महापालिका परिसरात सल्फर डाय ऑक्साईड, नायट्रोजन, धुलीकण, कार्बन मोनॉक्साईड  हवेतील प्रमाण हे प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केलेल्या विहित मर्यादेमध्ये आहे.  मात्र पावसाळ्यात ती पातळी तुलनेने कमी झाल्याचे दिसून येते.  शहराच्या विविध भागांमध्ये ध्वनी पातळी ही प्रदूषण मंडळाच्या विहित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे पर्यावरण अहवालावरुन दिसून येत आहे.  

पिंपरी-चिंचवड शहराचा सन 2021-22 चा पर्यावरण सद्यस्थिती अहवाल अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ  आणि पर्यावरण व अभियांत्रिकी विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी महापालिका प्रशासक राजेश पाटील यांच्याकडे आज (मंगळवारी) सादर केला.   पर्यावरणातील मुख्य घटकांतील बदलांचा अभ्यास करुन विश्लेषण करणे, सद्य:स्थितीतील जैवविविधतेची स्थिती अधोरेखित करणे, पर्यावरणातील बदलांची कारणे व परिणाम यांचे मुल्यांकन करणे, पर्यावरणातील उपलब्ध संसाधने व त्यांची मागणी यांचे नियोजन करणे, पर्यावरण संरक्षण व संवर्धनाबाबत जनजागृती करणे, नागरिक व लोकप्रतिनिधी यांचा पर्यावरण धोरण विकासात सहभाग वाढविण्यास प्रोत्साहन देणे, भविष्यातील पर्यावरणीय आव्हानांचा आढावा घेऊन धोरण निश्चिती करणे अशी या अहवालाची वैशिष्ट्ये आहेत.

महापालिकेतील विविध विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, विविध शासकीय निमशासकीय कार्यालये आदींकडून प्राप्त झालेल्या पर्यावरण विषयक माहिती तसेच स्कायलॅब या संस्थेने महापालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी केलेल्या वायू, ध्वनी, पाणी इ. चाचण्यांच्या निकषांवर हा अहवाल आधारित आहे.  विविध शासन संस्था, अशासकीय संस्था, वैज्ञानिक संस्था आदींकडून मिळालेले सहकार्य विविध संकेतस्थळांवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे.      

शहराचे हवामान, तापमान, पर्जन्यमान, मानव संसाधन, लोकसंख्या, दळणवळण याबाबत या अहवालात माहिती देण्यात आली आहे.  शहरातील हरीत क्षेत्रांची सद्यस्थिती यामध्ये नमूद करण्यात आली आहे.  हरीत क्षेत्रांच्या प्रमाणकांनुसार वृक्ष लागवड आणि उद्याने विकसित करण्यात आले असून सन 2020-21 च्या तुलनेत सन 2021-22 मध्ये 3 टक्क्याने वाढ झाली आहे.  शहरामध्ये आढळणा-या विविध जैवविविधतेपैकी काही नोंदी या अहवालात दर्शविण्यात आल्या आहेत.  जैवविविधतेचे संवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, घनकचरा विल्हेवाट प्रकल्प, मोशी कचरा डेपोमध्ये आलेल्या घनकच-याचा वार्षिक अहवाल, मटेरीअल रिकव्हरी फॅसिलीटी, मेकॅनिकल कंपोस्टींग प्रकल्प, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प,प्लॅस्टीक कच-यापासून पी.पी.पी. तत्वावर इंधन निर्मिती करणे, सेंद्रीय खतांची निर्मिती, बायोमायनिंग प्रकल्प, बांधकाम राडारोडा गोळा करुन प्रक्रिया करणेचा प्रकल्प आदींची माहिती या अहवालात देण्यात आली आहे.

   सन 2021-22 मध्ये शहरात 858075 किलो इतका जैव वैद्यकीय कचरा निर्माण झाला होता त्यावर प्रक्रीया करण्यात आली आहे.  महापालिका हद्दीत 36 घोषित झोपडपट्ट्या असून त्यामध्ये सुमारे 78 हजार 299 लोक राहतात. तर, 35 अघोषित झोपडपटट्या असून त्यामध्ये 69 हजार 511  लोक वास्तव्यास आहेत.  सन 2021-22 मध्ये बांधकाम क्षेत्रात वाढ झाली असून सन 2020-21 मध्ये हे क्षेत्र 1684340.99 इतके होते तर सन 2021-22 मध्ये 5266566.64 इतके बांधकाम क्षेत्र वाढले आहे.

 सन 2021 च्या तुलनेत सन 2021-22 मध्ये वाहनांच्या नोंदणी संख्येमध्ये वाढ झाली आहे.  नागरिकांना पुरविण्यात येणा-या पाण्याची गुणवत्ता ही आयएस मानांकनाच्या निर्धारीत मर्यादेमध्ये आहे महापालिका हद्दीतील काही ठिकाणी पाण्याची गुणवत्ता प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विहित मर्यादेत नसल्याचे नदी, तलाव, भूजल नमूने तपासणी अहवालातून दिसून येते.  पर्यावरण संतूलन राखण्यासाठी नागरी सहभाग आवश्यक असून शहराचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सर्वांच्या योगदानाची आवश्यकता असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.