पिंपरी, दि. १८ – दहशत पसरविण्यासाठी पिंपळे गुरव येथील मयूर नगरी जवळ दोन तरुणांनी १४ वाहनांची तोडफोड केली होती. दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घटनास्थळी घेऊन जात परिसरातून धिंड काढण्यात आली. शशिकांत दादाराव बनसोडे आणि प्रथमेश अरूण इंगळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पिंपळे गुरव आणि नवी सांगवीत दहशत माजविण्यासाठी दोन तरुणांनी १४ वाहनांची तोडफोड केली होती. तसेच, पत्ता न सांगितल्याने गतिमंद तरुणावर कोयत्याने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना रविवारी पहाटे चारच्या सुमारास घडली होती. सांगवी पोलिसांनी दोन्ही आरोपींना काही तासांतच जेरबंद केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार- पाच दिवसांपूर्वी पिंपळे गुरव येथील मयुरीनगरी हाउसिंग सोसायटीजवळ लाला पाटील आणि त्याच्या साथीदारांनी दोन जणांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेचा बदला घेण्यासाठी आरोपी बनसोडे व इंगळे हे पहाटे चारच्या सुमारास लाला पाटील याचा शोध घेत होते. यावेळी राजेश हा घराबाहेर उभा असताना आरोपींनी त्याला लाला पाटील याचा पत्ता विचारला. मात्र, त्याने पत्ता न सांगितल्याने तसेच त्याने कारच्या काचा फोडताना पाहिल्याने आरोपींनी राजेशवर कोयत्याने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकारानंतर आरोपी बनसोडे व इंगळे यांनी आपला मोर्चा मयूर नगरीकडे वळविला. जाताना रस्त्यात दिसतील त्या वाहनांवर कोयत्याने मारून काचा फोडल्या होत्या. तसेच कोयते हवेत फिरवत दहशत माजवत आरोपी पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोडफोडीच्या प्रकाराचा परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सांगवी पोलिसांनी तपास करीत काही तासांतच आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या.