पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – शहरातील प्रदुषण कमी होण्याच्या दृष्टीने महानगरपालिका विविध उपक्रम राबवित असून वाहनप्रदुषण कमी होण्याच्या दृष्टीने महापालिकेने सुमारे ७९ इलेक्ट्रिक वाहने भाडेतत्वावर घेण्याचे नियोजन केले आहे. यापूर्वी २२ इलेक्ट्रिक वाहने कार्यरत आहेत. आज टाटा नेक्सॉन वर्गातील ७ इलेक्ट्रिक वाहने महानगरपालिकेच्या यांत्रिकी विभागात दाखल झाली आहेत. या वाहनांच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य इमारतीत करण्यात आले होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उप आयुक्त रविकिरण घोडके, सह शहर अभियंता बाबासाहेब गलबले, प्रमोद ओंभासे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता बापू गायकवाड, कैलास दिवेकर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
महापालिकेच्या वतीने ५ वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्व करारावर वाहने घेणेत आली असून गरज पडल्यास वाहनांची संख्या वाढविण्याचे अथवा कमी करण्याचे प्रयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये २५ टाटा नेक्सॉन आणि ५४ टाटा टिगोर इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आहे.
महानगरपालिकेच्या धोरणानुसार अधिकारी व पदाधिकारी यांना एकुण ९५ वाहने मंजूर असून सद्यस्थितीतील पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांची संख्या कमी करून जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहन वापरावर भर दिला जाणार आहे. टाटा नेक्सॉन या वर्गातील वाहने एका चार्जिंगनंतर ३१२ किलोमीटर अंतर पार पाडतात. त्यासाठी ३० युनिट तर टाटा टिगोर ही वाहने एका चार्जिंगमध्ये १७० किलोमीटर अंतर पार पाडत असून त्यासाठी २६ युनिट इतकी वीज खर्ची पडते.
आज दाखल झालेली टाटा नेक्सॉन वाहने ही आधुनिक प्रणालीची असून या सर्व वाहनांमध्ये जीपीएस ट्रॅकर सिस्टीम बसवण्यात आली आहे. तसेच या प्रकारच्या वाहनांचा देखभाल व दुरूस्तीचा खर्च पेट्रोल आणि डिझेल वाहनांपेक्षा अत्यंत कमी असल्याने महापालिकेच्या वाहन खर्चात बचत होणार असल्याची माहिती सह शहर अभियंता बाबासाहेब गलबले यांनी दिली.