वाहनचोराकडून साडेबारा लाखांच्या तब्बल 24 दुचाकी हस्तगत; हडपसर पोलिसांची कामगिरी

0
37

पुणे, दि. ५ – ९ होंडा शाईन, ४ हिरो होंडा पॅशन, ४ स्पलेंडर, २ हिरो होंडा डिलक्स, २ अ‍ॅक्टीव्हा, अ‍ॅव्हेंनजर, होंडा डिओ, होंडा ड्रिमयुगा ही यादी आहे एका अट्टल वाहनचोराने चोरलेल्या वाहनांची. हडपसर पोलिसांनी अट्टल वाहनचोराकडून या २४ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
दिपक ऊर्फ जोजो बाबुराव सरवदे (वय ३०, रा. थोरात वस्ती, कोलवडी रोड, मांजरी) असे या वाहनचोराचे नाव आहे. त्याच्याकडून हडपसर पोलीस ठाण्यातील १९, मुंढवा पोलीस ठाण्यातील २, लोणीकंद पोलीस ठाण्यातील २ आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील एक गुन्हे उघडकीस आले आहेत. या २४ पैकी २३ दुचाकी त्याने या वर्षी चोरल्या होत्या. त्याने या दुचाकी पुणे शहर, धाराशिव आणि लातूर या ठिकाणी विकल्या होत्या. त्याच्यावर यापूर्वी वाहनचोरीचे अनेक गुन्हे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

हडपसर पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे सर्वाधिक गुन्हे दाखल होत असतात. हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी बैठक घेऊन सुचना दिल्या होत्या. त्यानुसार तपास पथक दिपक सरवदे याचा शोध घेत होते. परंतु, तो मिळून येत नव्हता. पोलीस अंमलदार दिपक कांबळे आणि चंद्रकांत रेजितवाड यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरुन पोलिसांनी दिपक सरवदे याला पकडले. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने २४ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याने ज्यांना ज्यांना या दुचाकी विकल्या. पुणे शहर, धाराशिव, लातूर येथे जाऊन १२ लाख ५० हजार रुपयांच्या २४ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त आर राजा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार दिपक कांबळे, चंद्रकांत रेजितवाड, सुशील लोणकर, संदीप राठोड, जोतीबा पवार, समीर पांडुळे, सचिन जाधव, निलेश किरवे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, भगवान हंबर्डे, अजित मदने, अतुल पंधरकर, अमित साखरे, अमोल दणके, कुंडलिक केसकर, तुकाराम झुंजार, अभिजित राऊत यांच्या पथकाने केली आहे.