वास्तूतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजींची हत्या

0
367

बंगळुरू, दि. ५ (पीसीबी) : सरळवास्तूच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे वास्तूतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजींची हत्या झाली आहे. कर्नाटकच्या हुबळीमध्ये एका हॉटेलमध्ये दुपारी चंद्रशेखर यांची निर्घृण हत्या करण्यात आली. चंद्रशेखर हॉटेलमध्ये कोणालातरी भेटायला गेले असताना त्यांच्यावर हल्ला झाला. हा हल्ला सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. रिसेप्शनजवळ असलेल्या चंद्रशेखर यांच्यावर चाकूनं वार होत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

चंद्रशेखर यांच्यावर हल्ला होत असलेला पाहून हॉटेलमधील काही कर्मचाऱ्यांनी त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोरांनी त्यांना चाकूचा धाक दाखवला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर गुरुजी त्यांच्या खासगी कामासाठी हुबळीला आले होते. चंद्रशेखर यांच्या हत्येमुळे परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी दोन हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.

हुबळीतील हॉस्टेलच्या रेसिप्शनमध्ये दोन व्यक्ती चंद्रशेखर यांना भेटायला आल्या. चंद्रशेखर सोफ्यावर बसताच दोघांनी त्यांना नमस्कार केला. एक जण त्यांच्या पाया पडला. त्यानंतर दोघांनी चंद्रशेखर यांच्यावर चाकूनं सपासप वार सुरू केले. पुढच्या काही मिनिटांमध्ये चंद्रशेखर रक्ताच्या थारोळ्यात पडले. ते मरण पावल्याची खात्री करून हल्लेखोर तिथून निघून गेले.

वास्तूतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले चंद्रशेखर आधी कंत्राटदार म्हणून काम करायचे. त्यानंतर त्यांना मुंबईत नोकरी मिळाली. मग चंद्रशेखर यांनी वास्तूचं काम सुरू केलं. लोकांना वास्तूची माहिती देण्यासाठी त्यांनी अनेक कार्यक्रम केले. काही वृत्तवाहिन्यांवरदेखील येऊनही ते मार्गदर्शन करायचे.