वाल्हेकरवाडी परिसरातील नदीकाठच्या 15 नागरिकांचे स्थलांतरण

0
439

पिंपरी दि. १४ (पीसीबी)  – पावसामुळे निर्माण होणा-या आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी महापालिकेची यंत्रणा सतर्क असून नदीकाठच्या ज्या भागात नेहमी पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती उदभवते तेथील नागरिकांना संभाव्य पूर परिस्थिती विचारात घेता सुरक्षित जागी स्थलांतरीत करण्याची कार्यवाही महापालिकेने सुरु केली आहे. वाल्हेकरवाडी येथील जाधवघाट परिसरातील नदीकाठच्या 15 व्यक्तींना रावेत येथील महापालिका शाळेत स्थलांतरीत करण्यात आले आहे.  

पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी महापालिका यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.  नदीच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असून ज्या भागात नदीचे पाणी शिरुन धोका उत्पन्न होऊ शकतो अशा भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यासाठी महापालिका यंत्रणा काम करीत आहे.  वाल्हेकरवाडी येथील जाधवघाट परिसरातील नदीकाठच्या 15 व्यक्तींना रावेत येथील महापालिका शाळेत स्थलांतरीत करण्यात आले आहे.  त्यांना जेवण तसेच आवश्यक सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.  

ब प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी अभिजीत हराळे, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, कनिष्ठ अभियंता अंकुश सयाजीराव, सहाय्यक आरोग्याधिकारी महादेव शिंदे यांच्यासह 15 कर्मचा-यांच्या टीमने ही मोहीम राबवली.  पावसाळ्यातील आपत्तीकाळात कोणतीही घटना घडल्यास त्याठिकाणी संबधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून समन्वयाने  परिस्थिती हाताळावी, असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी प्रशासनाला  दिले आहेत.  क्षेत्रीय अधिकारी आणि कार्यकारी अभियंत्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणांची पाहणी करुन कोठेही पाणी तुंबणार नाही याची दक्षता घ्यावी.  झाडांच्या फांद्या अथवा वृक्ष रस्त्यावर पडल्यास ते हटविण्यासाठी महापालिका यंत्रणा त्वरीत त्या ठिकाणी पाठवावी, असे आदेश आयुक्त पाटील यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.

 आयुक्त पाटील म्हणाले, आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवणा-या यंत्रणा सतर्क आणि सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.  नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने महापालिकेने सर्व प्रभाग तसेच सर्व अग्निशमन केंद्रांच्या ठिकाणी पुर नियंत्रण कक्ष सुरु केला आहे.  शिवाय महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष असून सर्व कक्ष 24 X 7 कार्यान्वित ठेवण्यात आले आहेत.  या ठिकाणचे दूरध्वनी आणि मोबाईल क्रमांक प्रसिध्द केले असून आपत्कालीन परिस्थितीवेळी नागरिकांनी या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले आहे.  नदीच्या पाण्याची पातळी वाढत असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे.
 
दरम्यान, क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पथक कार्यरत असून ज्या ठिकाणी पाणी तुंबण्याच्या आणि झाड पडण्याच्या घटना घडत आहेत तेथे या पथकाद्वारे तात्काळ कार्यवाही करण्यात येत आहे.