वाल्हेकरवाडीतील क्रिडांगणाची जागा हडपण्याचा प्रयत्न, पालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

0
97

चिंचवड, दि. 11 (पीसीबी) : चिंचवड वाल्हेकरवाडी प्रभाग क्रमांक १६ मधील स्वामी विवेकानंद क्रीडांगणची जागा हडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. नागरिकांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह, भूमी आणि जिंदगी विभागाकडे तक्रार दिली आहे. दरम्यान, पालिकेचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, असे समजले.

वाल्हेकरवाडी प्रभाग क्रमांक १६ प्राधिकरणाच्या हद्दीत होता. त्यावेळी पेठ क्रमांक ३० येथील सर्व्हे क्रमांक ७७ मधील जागा क्रमांक तीन आणि २० गुंठे जागेवर स्वामी विवेकानंद क्रीडांगण निर्माण केले होते. त्यानंतर त्या ठिकाणी सभामंडप, खेळणी, विरंगुळा केंद्र उभारले होते. पीएमआरडीएच्या वतीने सीमा भिंत बांधली होती. अविकसित भाग पीएमआरडीएत ठेवला आणि विकसित भाग महापालिकेत समाविष्ट केला. प्राधिकरणाने क्रीडांगणाची जागा पालिकेकडे हस्तांतरित केली. ही जागा तत्कालीन पीएमआरडीएचे नियोजक सुनील शेगर आणि उपलेखापाल व्ही. बी. चिंतल यांनी २५ मे २०२३ रोजी महापालिका भूमी आणि जिंदगी विभागाचे अधिकारी बक्षुभाई मुलांणी आणि प्राधिकृत अधिकारी संदीप लोहकरे यांच्याकडे हस्तांतरित केली होती.

क्रीडांगणाच्या विकासासाठी एक कोटी निधी

आरक्षणाच्या मागील बाजूस खासगी जागा आहेत, त्या जागांना जाण्यासाठी आरक्षणातील जागेतून रस्ता काढण्यात येत आहे, अशी नागरिकांची तक्रार आहे. शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे. महापालिकेच्या वतीने क्रीडांगणाचा विकास करण्यात येणार असून त्यासाठी सुमारे एक कोटीची तरतूद केली आहे. त्या ठिकाणी योगासेंटर उभारण्यात येणार आहे. लहान मुलांची खेळणी उभारण्यात येणार आहे.