सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड या दोघांना बीड जिल्हा कारागृहात मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या कारागृहात सकाळी कैद्यांच्या दोन गटात तुफान राडा झाला. यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळं मोठा अनर्थ टळला.
मकोका कायद्याअंतर्गत आरोपी असलेला वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले हे दोघे सध्या बीडच्या कारागृहात कैद आहेत. तसेच संतोष देशमुख हत्याकांडातील इतर आरोपीही त्याच तुरूंगात आहेत. तर मिळालेल्या माहितीनुसार, तर बाजूच्या, दुसऱ्या बॅरेकमध्ये अक्षय आठवले नावाचा आरोपी असून तोही मकोका कायद्याअंतर्गत शिक्षा भोगत आहे. तर महादेव गीते हा परळीतील आणखी एक आरोपी आहे. ते दोघे वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांच्या अंगावर धावून गेल्याची माहिती मिळाली आहे.
सकाळी नाश्ता झाल्यानंतर 11 च्या सुमारास जामीन मिळालेल्या आरोपींना बाहेर सोडण्यात येत. त्यावेळेस सर्व बंदी हे बराकीच्या बाहेर आलेले असतात. आज सकाळीही सर्व कैदी बाहेर आल्यानंतरच सदर प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या घटनेबाबत अद्याप कोणताही दुजोरा मिळालेला नाही. मात्र, भाजप आमदार सुरेश धस यांनी बबन गिते गँगमधील महादेव गितेने वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचा दावा केला आहे.
काय म्हणाले आहेत धस?
एका वृत्तवाहिनीशी बोलताना धस यांनी, वाल्मिक कराड विरुद्ध बबन गिते अशा परळीतल्या टोळीयुद्धाचा हा परिणाम असल्याचे मत व्यक्त केलं आहे. वाल्मिक कराड आधी म्हणायचे की, याला संपवल्याशिवाय मी चप्पल घालणार नाही. तर गित्ते म्हणायचा की कराडला संपवल्याशिवाय मी दाढी करणार नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणात नावं चुकीच्या पद्धतीनं नावं गोवली यावरून ही मारहाण झाली असावी, असं सुरेश धस यांनी सांगितलं आहे. कारागृहातील सुरक्षा आणि बीड पोलिस यावर चार तासांचा सिनेमा निघेल. मी तिथे जाऊन पोलिसांशी बोलून जास्त माहिती देतो, असंही सुरेश धस यांनी सांगितले.