दि . 31 ( पीसीबी ) – सोमवारी सकाळी बीड जिल्हा कारागृहात दोन गटांमध्ये तुफान राडा झाला असून, या गोंधळात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर हल्ला झाला. यानंतर फरार असलेला बबन गीत्ते याने थेट सोशल मीडियावर धमकी दिल्याने बीडमध्ये पुन्हा टोळीसंघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले हे दोघे नाश्त्यासाठी बॅरेकमधून बाहेर आले असताना त्यांच्यावर अचानक हल्ला झाला. हा हल्ला महादेव गीत्ते आणि अक्षय आठवले या दोघांनी केला असून, ते गीत्ते टोळीशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. या घटनेला कारण ठरलेली जुनी दुश्मनी पुन्हा उफाळून आल्याची माहिती आहे.
या प्रकाराबाबत भाजप आमदार सुरेश धस यांनीही संकेत दिले असून, तुरुंगातील वाढती गुन्हेगारी आणि टोळी गटांचे वर्चस्व पाहता परिस्थिती गंभीर बनली आहे. तुरुंगातच आरोपींवर प्राणघातक हल्ला होणं ही कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने धोक्याची घंटा मानली जात आहे.
बबन गीत्तेची सोशल मीडियावर धमकी-
हल्ल्यानंतर फरार असलेल्या बबन गीत्तेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत थेट धमकीच दिली आहे. ‘अंदर मारना या मरना सबकुछ माफ है’ असे लिहित त्याने फेसबुकवर आपला फोटो टाकत भविष्यातील हिंसाचाराची सूचकवाणी दिली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.
बबन गीत्ते हा सरपंच बापू आंधळे यांच्या खून प्रकरणात आरोपी असून, तो गेल्या काही महिन्यांपासून फरार आहे. त्याचं वाल्मीक कराडशी जुनं वैर असून, त्याच्याचमुळे आपल्यावर खूनाचा आरोप आल्याचा त्याचा दावा आहे. त्यामुळेच गीत्ते गँगच्या सदस्यांनी तुरुंगातच वाल्मीकवर हल्ला केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. यामुळे बीडमध्ये पुन्हा टोळीवादाचे वातावरण तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.