दि. 24 (पीसीबी) – बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती अचानक खालावल्याने त्याला तातडीने बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराडच्या जीवाला धोका असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
न्यायालयीन कोठडीनंतर अचानक प्रकृती बिघडली
खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला बुधवारी (२४ जानेवारी) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावण्यात आली होती. त्याला बीड येथील कारागृहात (Jail) ठेवण्यात आले होते. मात्र, काल रात्री त्याच्या पोटात दुखू लागल्याने त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
‘वाल्मिकचा गेम केला जाईल’; तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराडच्या जीवाला धोका असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. “वाल्मिकचा गेम केला जाईल,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वीही वाल्मिकच्या एनकाउंटरची भीती व्यक्त करण्यात आली होती. आता त्याला आयसीयूमध्ये दाखल केल्यानंतर पुन्हा एकदा या चर्चांना उधाण आले आहे.
‘त्याला ऑर्थर रोड जेलमध्ये ठेवा’; अंजली दमानियांची मागणी
“वाल्मिक कराडला ऑर्थर रोड जेलमध्ये आणि जेजे मध्ये ठेवा,” अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. त्याला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. “छगन भुजबळ या तुरुंगात जशी छातीत कळ यायची तशी वाल्मिक कराडला येत असेल, त्याच्या सोयीसाठी मेडिकल ग्राउंड तयार केला जात आहे,” असा गंभीर आरोप दमानिया यांनी केला आहे.
धनंजय मुंडेंवरही गंभीर आरोप
“महाजेनकोतून आर्थिक लाभ धनंजय मुंडे यांनी घेतला आहे. त्यांची आमदारकी रद्द होईल जर कारवाई झाली तर. घरकुल योजना , कृषी पंप घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांमध्ये धनंजय मुंडेंचा सहभाग असून, त्यांनी ८०० रुपयांचा फरक लाटत कित्येक कोटी रुपये कमावले आहेत. वाल्मिक कराड हा घरगडी होता. त्याच्या नावावर महागड्या गाड्या फ्लॅट, जमिनी आहेत. लातूरला १० एकर द्राक्ष बाग वाईन शॉपसाठी त्याने जमीन घेतली आहे,” असे गंभीर आरोप दमानिया यांनी केले आहेत.
“वाल्मिकने तोंड उघडल्यास धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) भोगावे लागेल”
“तृप्ती देसाई काय बोलल्या हे माहीत नाही पण वाल्मिक कराडचे हात धनंजय मुंडे यांच्यापर्यंत पोहोचत असतील तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करा, त्याने तोंड उघडलं तर धनंजय मुंडेंना भोगावे लागेल,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.