वाल्मिक कराडचा एन्काऊंटर होण्याची शक्यता ?

0
26

– मोठ्या आकाला वाचविण्यासाठी छोट्या आकाचा…

मुंबई, दि.02 (पीसीबी): संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोप असलेला वाल्मिक कराड पोलीस कोठडीमध्ये आहे. मंत्री धनंजय मुंडे जवळचा आणि विश्वासू असलेल्या कराडची चौकशी सुरू आहे. यादरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक विधान केलं आहे. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करू नका, असं वडेट्टीवारांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना महायुती सरकारवही निशाणा साधला.

पोलीस २२ दिवसांमध्ये वाल्मिक कराडला पकडू शकले नाहीत हे त्यांचं अपयश आहे. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी याचा एन्काऊंटर करू नका बाबा. हा बिचारा म्हणणार नाही, पण मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी याचा वापर होईल तर हा पुरावा नष्ट होण्याची शक्यता आहे. मला विश्वसनीय माहिती जवळच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली. या प्रकरणामध्ये काहीही होऊ शकतं अशी शक्यता असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

अनेक पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांचा जो अनुभव आहे, बीडमध्ये नेहमी मर्जीतला माणूस असतो. यापूर्वीचा इतिहास असा आहे की कराडलाच बाप माणून पोलीस वागत होते. पोलिसांची प्रतिमा मलिन होताना दिसत आहे. जनतेमध्ये चर्चा आहे त्याकडे लक्ष दिलं नाही तर पोलिस विभागाचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. एसआयटी तपास भरकटवण्यासाठी तर केली नाही ना? आरोपीवर कशा प्रकारे चार्जशीट आणि कारवाई करतात हे पाहावं लागणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.