पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – वायसीएम रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून एड्स नियंत्रणासाठी बजाज ऑटो कंपनीच्या सहकार्याने सुरू असलेले अॅण्टी रिट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) सेंटर आता वायसीएम रुग्णालयातील पीजी इन्स्टिट्यूटमार्फत चालविण्यात येणार आहे. या सेंटरसाठी 10 अधिकारी-कर्मचारी आऊटसोर्सिंगद्वारे उपलब्ध करून घेण्यात येणार आहेत. त्यासाठी एक वर्षांकरिता 45 लाख रुपये खर्च होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने नोंदणीकृत संस्थेमार्फत विविध पदावरील अधिकारी-कर्मचारी आऊटसोर्सिंगद्वारे उपलब्ध करून घेण्यात येतात. वायसीएम रुग्णालयाकरिता बीव्हीजी इंडिया लिमिटेड या कंपनीकडून -कर्मचारी पुरविण्यात येतात. वायसीएम रुग्णालयात अॅण्टी रिट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) सेंटर कार्यान्वित आहे. हे सेंटर बजाज ऑटो लिमिटेड, राज्य एड्स नियंत्रण संस्था आणि महापालिका यांच्यातील त्रिपक्षीय सामंजस्य कराराद्वारे कार्यरत होते. हा करार 31 ऑगस्ट 2022 रोजी संपुष्टात आला आहे. त्यामुळे हे एआरटी सेंटर वायसीएम रुग्णालयातील पदव्युत्तर पदविका इन्स्टिट्यूटमार्फत चालविण्याचे प्रयोजन आहे.
त्यासाठी बीव्हीजी इंडिया कंपनीकडून एक वर्ष कालावधीकरिता आवश्यक मनुष्यबळ पुरवठा करण्यात येणार आहे. त्यानुसार, वैद्यकीय अधिकारी या वर्ग एकच्या पदासह समुपदेशक, फार्मासिस्ट, स्टाफनर्स, लॅब टेक्निशियन अशी एकूण 10 पदे घेण्यात येणार आहेत. त्यांच्या प्रतिमाह वेतनावर एकूण 3 लाख 35 हजार रुपये खर्च होणार आहे. तसेच या सेंटरमधील विविध उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीसाठी 4 लाख 77 हजार रुपये खर्च होणार आहे. असा एकूण 45 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.