वायसीएम रुग्णालयातील इंटरनेट सेवा ठप्प; अ‍ॅडमीट होणाऱ्या रुग्णांना मोठा फटका

0
19

दि . १७ ( पीसीबी ) – आज सकाळपासूनच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण (वायसीएम) रुग्णालयातील इंटरनेट सेवा अचानक बंद पडल्यामुळं रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांमध्ये मोठी तारांबळ उडाली आहे. त्याचा मोठा फटका येथे अ‍ॅडमीट होणाऱ्या रुग्णांना तसेच ओपीडीत उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना सोसावा लागत आहे.

अ‍ॅडमीट होण्यासाठी तसेच ओपीडीत उपचारासाठी नोंदणी करणे गरजेचे असते. इंटरनेट सेवा बंद पडल्यामुळे अ‍ॅडमिशन अभावी रुग्णांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळं प्रशासनाने तातडीने या प्रकरणात लक्ष घालून संबंधितांवर कडक कारवाई करावी. पुन्हा अशाप्रकारे इंटरनेट सेवा ठप्प पडणार नाही याकरिता योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.

शहरातील सर्वात मोठे हे सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय आहे, येथे दररोज ओपीडी अंतर्गत आणि तातडीच्या आजारांसाठी अंदाजे हजारपेक्षा अधिक रुग्णांची नोंद केली जाते. मात्र, इंटरनेट सेवा ठप्प असल्यामुळे  उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना मोठा अडचणींना सामोरे जावं लागत आहे.