वायसीएमच्या ‘ओसीटी’ मशीन खरेदीत घोळ; चौकशी करा – आमदार बनसोडे यांचे मुख्यमंत्र्याना पत्र

0
241

पिंपरी, दि.१० (पीसीबी) – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात रुग्णांचे डोळे तपासणीसाठी भांडार विभागाने ऑप्टिकल सुसंगत टोमोग्राफी (ओसीटी) मशीनची खरेदी केली आहे. मशीन खरेदी करताना भांडार उपायुक्त, वैद्यकीय अधिष्ठाता, बॉयोमेडीकल इंजिनिअर यांनी ठेकेदाराशी केलेल्या वाटाघाटीमुळे ओसीटी मशीन खरेदीत घोळ झाला असून ठेकेदाराने स्पेसिफिकेशन बदलून मशीनचा पुरवठा केला आहे. त्यामुळे ओसीटी मशीन खरेदीची चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार आण्णा बनसोडे यांनी केली आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास सचिव यांना पत्र देत ओसीटी मशीन खरेदीत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करुन दोषी अधिका-यांवर कारवाईची मागणी केली आहे. त्यानुसार नगरविकास विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

महापालिकेच्या भांडार विभागाने वायसीएम रुग्णालयातील पीजीआय नेत्र विभागाच्या मागणीनूसार ऑप्टिकल सुसंगत टोमोग्राफी (ओसीटी) मशीन खरेदीची निविदा प्रक्रिया राबविली होती. भांडार विभागाने जेम पोर्टलवर सुमारे 90 लाख रुपयाचे मशीन खरेदीस Gem/2022/B/2133845 निविदा प्रसिध्द केली होती. त्यानूसार आद्या प्रॉपर्टीज आणि आर्थरॉन टेक्नॉलॉजीज हे दोन ठेकेदार पात्र ठरले. L1 आद्या प्रॉपर्टीज ठेकेदाराने 55 लाख 88 हजार दराने Horvitz Ltd, या कोरियन कंपनीचे तर L2 आर्थरॉन टेक्नॉलॉजीज आणि एंटरप्राइजेस ठेकेदाराने 63 लाख रुपये दराने Zeiss, या जर्मन कंपनीचे मशीन दिले जाणार होते.

महापालिकेच्या भांडार विभागाने ‘ओसीटी’ मशीन खरेदीसाठी 15U (मायक्रॉन) रिझोल्यूशनपेक्षा अधिक चांगले स्पेसिफिकेशन मागितले होते. मात्र, संबंधित आद्या प्रॉपर्टीज ठेकेदाराने 20U (मायक्रॉन) रिझोल्यूशनचे मशीन दिले आहे. त्यामुळे ठेकेदाराने दिलेले ‘ओसीटी’ मशीन उपकरणाचे स्पेसिफिकेशन आणि मनपा स्पेसिफिकेशन यामध्ये खुपच तफावत आढळून आले आहे. याबाबत बॉयोमेडीकल इंजिनिअर आणि डॉक्टरच्या टीमने ‘ओसीटी’ मशीन स्पेसिफिकेशनमध्ये तफावत असतानाही ठेकेदाराशी अर्थपुर्ण संबंधाने समाधानकारक अहवाल दिला आहे.

दरम्यान, वायसीएमच्या नेत्र विभागात ओसीटी मशीनने रुग्णाच्या डोळ्याची तपासणी करण्यात येणार आहे. ‘ओसीटी’ मशीन खरेदीत मनपाने दिलेले स्पेसिफिकेशन आणि ठेकेदाराचे स्पेसिफिकेशनमध्ये खूपच तफावत आहे. या मशीन खरेदीत गैरव्यवहार झालेला असून वायसीएम अधिष्ठाता, बॉयोमेडिकल इंजिनिअर, भांडार उपायुक्त यांच्या संगनमताने ठेकेदारास मदत करण्यात येत आहे. त्यामुळे सदर मशीन खरेदीत घोटाळा झाला असून त्या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्यात यावी, दोषी आढळणा-या अधिका-यावर कडक कारवाई करावी, सदरील ठेकेदाराचा पुरवठा आदेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी आमदार बनसोडे यांनी केली आहे.

आयुक्तांची द्विधा मनस्थिती.. ‘ओसीटीत’ ठेकेदाराला पाठिंबा?

वायसीएम रुग्णालयासाठी सुमारे सव्वा कोटी खर्च करुन २० हाय वॅक्युम सक्षन मशीन खरेदी करण्यात आल्या. मात्र, खरेदीसाठी महापालिकेने दिलेल्या स्पेसिफिकेशननूसार मशीन न देता, ठेकेदाराने बदलून दिल्या. हाय वैक्‍युम सक्षन मशीन खरेदीत टेक्‍निकल स्पेसिफिकेशननुसार निविदेतील अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याचा ठपका पुरवठादारावर ठेवण्यात आला. त्यामुळे खरेदी केलेल्या मशीन आणि निविदेतील नमूद स्पेसिफिकेशन तपासून आयुक्त शेखर सिंह यांनी मे. सेबर्ड सिस्टम्स आयएनसी ठेकेदाराचा पुरवठा आदेश रद्द केला आहे. त्याप्रमाणेच ‘ओसीटी’ मशीन खरेदीत मनपाने दिलेले स्पेसिफिकेशन आणि ठेकेदाराचे स्पेसिफिकेशनमध्ये खूपच तफावत आहे. असे असताना देखील आयुक्त शेखर सिंह हे संबंधित ठेकेदाराला पाठिशी घालत आहेत. त्यामुळे स्पेसिफिकेशन बदल्याने एका ठेकेदाराचा पुरवठा आदेश रद्द केला, मात्र, त्यानूसार ओसीटी मशीन खरेदीत स्पेसिफिकेशन बदलेले असताना पुरवठा आदेश रद्द करण्यास आयुक्त नकार देत आहेत.