दि. २३ जुलै (पीसीबी) – वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर सध्या नॉट रिचेबल आहे. त्यांना पुणे पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले होते. दोन वेळा समन्स बजावून त्या आल्या नाही. त्यानंतर मसूरी येथील आयएएस प्रशिक्षणार्थींसाठी असणारी लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये त्यांना २३ जुलैपर्यंत हजर होण्याचे आदेश दिले होते. परंतु त्या ठिकाणी त्या हजर झाल्या नाहीत. पूजा खेडकर यांना कळले आहे की आता आपल्याकडे पळवाट राहिली नसल्याने पळून गेल्या असाव्यात, असा दावा माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे.
नॉन क्रिमिलेअर मिळाले कसे
विजय कुंभार यांनी म्हटले आहे की, पूजा खेडकर यांना कळले आहे की आता आपल्याकडे पळवाट राहिली नाही. त्यांची आई कारागृहात आहे. वडिलांची चौकशी सुरु आहे. अडचणी आल्यामुळे त्या पळून गेल्या असाव्यात. मनोरमा खेडकर यांच्याकडे दोन कोटींचा बंगला आहे. कोट्यवधींची संपत्ती आहे. त्यानंतर त्यांना नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट मिळाले कसे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
केंद्र सरकारने खेडकर यांचा घटस्फोट झाला आहे की नाही याची माहिती मागितली आहे. त्यावर बोलताना विजय कुंभार म्हणाले की, 2003 पासून घटस्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. ते विभक्त झाले आहेत की नाही याचा फरक पडत नाही. मनोरमा खेडकर यांचे वडील आणि पती हे क्लास वन अधिकारी होते त्यांना नॉन क्रिमिलेअर घेत येत नव्हते म्हणून त्यांनी घटस्फोट घेतल्याचे भासवले.
1995 ते 2005 च्या काळात 1 लाख 60 हजार स्केअर फूटाची जागा त्यांनी स्वतःच्या खिशातील पैशातून घेतला आहे. नॅशनल सोसायटीत 45 लाखांची जागा घेतली आणि त्यावर दीड कोटींचा बांधकाम केले. एवढी मालमत्ता असलेल्या व्यक्तीला नॉन क्रिमिलेअर मिळू कसे शकते? यामुळे त्यांनी जे प्रतिज्ञापत्र दिले आहे ते खोटे आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ते पती- पत्नी असल्याचं दाखवले आहे. उत्पन्न जाहीर केले आहे. एकंदरीत त्यांच्याकडे सर्व गोंधळ आहे. या सर्व प्रकरणाची दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचनेही चौकशी सुरु केली आहे.