- अर्चना करांडे, योगीता नागरगोजे, निखिल बोऱ्हाडे, सुजाता निलेश बोराटे, सागर बाळासाहेब गवळी, सोनाली दत्तात्रेय गव्हाणे,शाम जगताप, कुंदा संजय भिसे, रविना सागर अंघोळकर आदींच्या सह्या
पिंपरी, दि. ९ – ठेकेदार आणि महापालिका अधिकारी यांनी मिळून निधी वर्गिकरणाच्या बनावट उपसुचनांद्वारे तब्बल ५२ कोटींची बिले परस्पर अदा केल्याचा मोठा आरोप स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी लेखा विभागप्रमुख प्रवीण जैन यांच्यावर केल्याने महापालिकेत आणि शहरातही खळबळ आहे. दरम्यान, या उपसुचनांवर स्वाक्षरी करणाऱ्या नगरसेवकांची नावे समोर आली असून बहुतांश भोसरी विधानसभा मतदारसंघातील आहेत. अर्चना करांडे, योगीता नागरगोजे, निखिल बोऱ्हाडे, सुजाता निलेश बोराटे, सागर बाळासाहेब गवळी, सोनाली दत्तात्रेय गव्हाणे या भोसरी मतदारसंघातील नगरसेवकांशिवाय शाम जगताप, कुंदा संजय भिसे, रविना सागर अंघोळकर यांची नावे चर्चेत आहेत. धक्कादायक प्रकर म्हणजे काही स्वाक्षऱी या दोन वेगवेगळ्या असल्याने संशय बळावला आहे. इंग्रजीत फक्त आरती, आर. एस. अंगोळकर, एस. बी. गवळी या तीन स्वाक्षऱ्या दुसऱ्या पध्दतीनेसुध्दा आहेत.
३१ मार्च २०२६ हे आर्थिक वर्षे संपताना बिले अदा करण्याची घाई असते. लेखा विभागाला स्थायी समिती अध्यक्षांनी याबाबत विविध कामांच्या बिलांबद्दल विचारणा केली तेव्हा पैसे शिल्लक नाहीत, निधी वर्ग करावे लागतील असे सांगून टाळण्यात आले. प्रत्यक्षात याच लेखा विभागाने विविध ७० कामांचे ५२ कोटी रुपये निधी वर्ग करण्याच्या खोट्या उपसुचनांद्वारे परस्पर अदा केल्याचे उघड झाले. स्थायी समिती किंवा महापालिका सर्वसाधारण सभेला याची यत्किंतही कल्पना नसल्याचा गौप्यस्फोट अभिषेक बारणे यांनी केला. संबंधित विभागांचे अधिकाऱ्यांनाही याची कल्पना नसल्याचे उघड झाले. सर्वसाधारण सभेतसुध्दा अशी एकही उपसुचना आली नाही आणि मंजूरसुध्दा नसल्याचे नगर सचिव विभागाने स्पष्ट केल्याने संशय गडद झाला.
लेखा विभाग प्रमुख प्रवीण जैन यांनी नगरसेवकांनी सही करून उपसुचना थेट आपल्याकडे दिल्या मात्र, सार्वजनिक सुट्या आल्याचे कारण देत आपली बाजू कशी बरोबर आहे ते स्पष्ट केले. नगरसेवकांचा मान राखून त्यांच्या सह्या असलेल्या उपसुचनांनुसारच आपण रितसर काम केल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, नगरसेवकांच्या सह्या खऱ्या की खोट्या यावर आता संशय बळावला आहे. नगरसेवकांच्या परस्पर त्यांच्या सह्या करून उपसुचनांद्वारे अन्य कामांचा निधी वर्ग करून ठेकेदारांची बिले अधिकाऱ्यांनी काढून दिली, अशीही चर्चा आहे. परिणामी हे सह्या करणारे नगरसेवक कोण याबाबत उत्कंठा सर्वांना लागून राहिली आहे. त्या नगरसेवकांचीच नावे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.









































